For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परिस्थिती अशीच राहिल्यास आणखी 62 गावांना पाणीटंचाईची झळ

06:49 AM Jun 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
परिस्थिती अशीच राहिल्यास आणखी 62 गावांना पाणीटंचाईची झळ
Advertisement

जिल्ह्यातील 14 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

Advertisement

पावसाच्या अभावामुळे शहरासह जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. सध्या जिल्हा प्रशासनाकडून 14 गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास अंदाजे 62 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते, असा अंदाज प्रशासनाने बांधला आहे.

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव : अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयाची पाणीपातळी खालावली आहे. यंदा पावसाळ्यातच भूजल पातळी 800 ते 1000 फुटांनी खालावली आहे. त्यामुळे बेळगाव, खानापूर, चिकोडी, अथणी आणि रामदुर्ग तालुक्यातील 14 गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. जून महिनाअखेरपर्यंत पाऊस न झाल्यास बेळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या 45 प्रभागांमध्ये तर ग्रामपंचायतींच्या अखत्यारितील 62 गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयात गेल्यावर्षी जून महिन्याच्या अखेरीस पिण्याच्या पाण्यासाठी 17.54 टीएमसी पाणी उपलब्ध होते. यावेळी केवळ 5.24 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. राकसकोप जलाशय रिकामा झाला असून केवळ काही दिवसापुरतेच पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहरालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या 12 ते 13 दिवसांतून एकदा एक तास पाणीपुरवठा केला जात आहे. काही प्रभागांमध्ये मागणीनुसार एलअॅण्डटीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मान्सूनला सुरुवात न झाल्यास जुलै महिन्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एलअॅण्डटी आणि महानगरपालिकेकडून जनतेला पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केले जात आहे.

सध्या 86 बोअरवेलच्या माध्यमातून दररोज पाणीपुरवठा

पिण्याच्या पाण्यासह जनावरांना लागणारे पाणीदेखील काही ठिकाणी मिळत नसल्याने बहुतांश ठिकाणी टँकरची मागणी वाढली आहे. खासगी टँकरसाठी 1500 ते 2000 रुपये मोजावे लागत आहेत. संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून टँकर खरेदी करण्यात आले आहेत. पाण्यासाठी 148 खासगी बोअरवेल, भाडोत्री करारावर घेण्याची तयारी चालविली आहे. यापैकी सध्या 86 बोअरवेलच्या माध्यमातून दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

पाण्याची समस्या असणारे तालुके

सध्याच्या परिस्थितीत अथणी तालुक्यातील 2, बैलहोंगल 4, चिकोडी 4, खानापूर 8, बेळगाव 13, रामदुर्ग 3, रायबाग 13 आणि मुडलगी 6, हुक्केरी 4 त्याचबरोबर महानगरपालिकेच्या काही प्रभागांमध्ये पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि एलअॅण्डटीकडून संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

Advertisement
Tags :

.