सावंतवाडी न्यायालयासाठी आयटीआयची जागा निश्चितीच्या मार्गावर
सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी न्यायालयाची अद्ययावत व भव्य इमारत उभारण्याच्या दृष्टीने शहरातील जागा निश्चित करण्यासाठी महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे तसेच महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य ॲड. संग्राम देसाई यांनी मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची भेट घेतली.
यावेळी सावंतवाडी पोलीस ठाण्यालगत असलेल्या आयटीआयच्या परिसरातील जागा न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. यावर मंत्री लोढा यांनी, "याबाबत निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेऊ,"असे आश्वासन दिले. या बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांच्याशी मुंबईहून ऑनलाइन चर्चाही करण्यात आली. त्यांनीही संबंधित जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सावंतवाडी न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठीच्या जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबद्दल सावंतवाडी तालुका वकील संघटनेच्या सर्व वकील बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच हा मार्ग सुकर झाला असल्याचे वकील बांधवांनी नमूद केले. सावंतवाडी तालुका न्यायालयाची भव्य व अद्ययावत इमारत उभारावी, अशी मागणी वकील संघटनेकडून करण्यात आली होती. त्यानुसार ॲड. परिमल नाईक यांनी विविध जागांची पाहणी केली. सावंतवाडी पोलीस ठाण्यालगत आयटीआयच्या परिसरातील जागा न्यायालयासाठी अत्यंत सोयीची व सुलभ असल्याचे त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना निदर्शनास आणून दिले. तसेच महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. संग्राम देसाई यांच्याकडेही ही मागणी करण्यात आली.
यानंतर ॲड. संग्राम देसाई यांनी ही बाब पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी तातडीने मंत्रालयात मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची भेट घेऊन न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर न्यायालयांच्या समस्या व अडचणींबाबतही चर्चा झाली. याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, असे आश्वासन मंत्री लोढा यांनी दिल्याचे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी सांगितले.