सीताराम येचुरी यांचे निधन
वयाच्या 72 व्या वर्षी दिल्लीतील एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास : माकप सरचिटणीस येचुरी यांच्या निधनाने डाव्या आघाडीची हानी,राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांनी व्यक्त केला शोक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीएम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी वयाच्या 72 व्या वषी निधन झाले. दीर्घ आजारानंतर त्यांनी एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ आजारामुळे त्यांना अलिकडेच एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. येचुरी सध्या माकपचे सरचिटणीस होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या निधनामुळे डाव्या आघाडीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
72 वर्षीय सीताराम येचुरी यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तापाच्या तक्रारीनंतर त्यांना 19 ऑगस्टपासून एम्सच्या आपत्कालीन विभागात हलवण्यात आले होते. तसेच त्यांना श्वसनमार्गाच्या तीव्र संसर्गाने ग्रासले होते. काही काळापूर्वी त्यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह मान्यवर राजकारण्यांनी शोक व्यक्त केला आहे.
सीताराम येचुरी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस होते. 1992 पासून ते माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्यही होते. 1984 मध्ये त्यांना सीपीआय-एमच्या केंद्रीय समितीचे सदस्य बनवण्यात आले होते. 2015 मध्ये ते सीपीआय-एमचे सरचिटणीस बनले आणि तेव्हापासून ते या पदावर कार्यरत होते. यापूर्वी येचुरी 2005 ते 2017 पर्यंत पश्चिम बंगालमधून राज्यसभेचे खासदार होते. ते 1974 मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियामध्ये सामील झाल्यानंतर वर्षभरातच ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) मध्ये सामील झाले होते. येचुरी यांनी 2004 मध्ये काँग्रेसप्रणित सरकार केंद्रात स्थापन झाल्यानंतर या सरकारसाठी किमान समान कार्यक्रम तयार केला होता. त्यांना याकामी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सहकार्य केले होते.
कौटुंबिक-राजकीय पार्श्वभूमी
सीताराम येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी मद्रास (चेन्नई) येथे तेलुगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्रप्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळात अभियंता होते. त्यांची आई कल्पकम येचुरी सरकारी अधिकारी होत्या. ते हैदराबादमध्येच लहानाचे मोठे झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी हैदराबादच्या सेंट्स हायस्कूलमध्ये घेतले आहे. यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए (ऑनर्स) चे शिक्षण घेतले आणि त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए ही पदवी प्राप्त केली. आणीबाणीच्या काळात जेएनयूमध्ये विद्यार्थी असताना त्यांना अटक करण्यात आली होती. येचुरी यांनी 50 वर्षांपूर्वी विद्यार्थी नेता म्हणून सीपीएममध्ये प्रवेश केला होता. ते सलग तीनवेळा पक्षाचे सरचिटणीस होते. 2021 मध्ये येचुरी यांचा मुलगा आशिष येचुरी यांचा वयाच्या अवघ्या 34 व्या वषी कोविडमुळे मृत्यू झाला होता.