मतचोरी प्रकरणी एसआयटीचे कलबुर्गीत छापे
माजी आमदार सुभाष गुत्तेदार यांच्या निवासस्थानासह तीन ठिकाणी झडती
बेंगळूर : कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद विधानसभा मतदारसंघातील मतचोरी प्रकरणी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी तपास गतिमान केला आहे. शुक्रवारी आळंदमधील भाजपचे माजी आमदार सुभाष गुत्तेदार यांच्या निवासस्थानासह तीन ठिकाणी एसआयटीच्या पथकांनी छापे टाकले. एसआयटीच्या अधीक्षक शुभान्वीता यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. एसआयटीने गुरुवारी कलबुर्गीत अक्रम यांच्या निवासस्थानावर धाड टाकली होती. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर मतदार ओळखपत्रे सापडली. एकूण 15 मोबाईल, 7 लॅपटॉप एसआयटीने जप्त केले होते. या पाठोपाठ शुक्रवारी सुभाष गुत्तेदार यांच्या मालमत्तांवर धाडी टाकल्या.
आळंद मतदारसंघासह कलबुर्गी जिल्ह्यातील आणखी दोन मतदारसंघांत मतदानावेळी गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून होत आहे. भाजपचे दोन नेत्यांचे चार्टर्ड अकौंटंट असणारे मल्लिकार्जुन महांतगोळ यांचे निवासस्थान व कार्यालयावरही छापा टाकण्यात आला आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात मतदारसंघात मतदारयादी दुरुस्तीसाठी मल्लिकार्जुन यांनी अक्रम याच्याशी सौदा केल्याचा संशय आहे. त्यामुळे एसआयटीने मल्लिकार्जुन यांच्या निवासस्थान आणि कार्यालयाची झडती घेतली. 2023 च्या निवडणुकीत आळंद मतदारसंघात मतचोरी झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे आमदार बी. आर. पाटील यांनी तक्रार दिली होती.