तिरुपती लाडू भेसळप्रकरणी एसआयटी तपास सुरू
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर कारवाई : प्रसादासाठी भेसळयुक्त तूप वापरल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ तिरुपती
आंध्रप्रदेशातील तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या प्रसादात (लाडू) भेसळयुक्त तूप वापरल्याच्या आरोपाची चौकशी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आंध्रप्रदेश पोलिसांचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी सर्वेश त्रिपाठी हे तपास करत आहेत. 4 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने या मुद्यावर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी आणि वायएसआरसीपी राज्यसभा सदस्य वाय. व्ही. सुब्बा रे•ाr यांच्या याचिकांवर चौकशीचे आदेश दिल्यानंतर एसआयटीचा तपास सुरू झाला.
जगनमोहन सरकारच्या काळात तिरुमला तिरुपती देवस्थानने लाडू बनवताना प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला होता. राज्यातील वाय एस जगनमोहन रे•ाr यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात तिरुपती लाडू तयार करण्यासाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला होता, असा दावा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सप्टेंबरमध्ये केला होता. या दाव्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. या आरोपांना उत्तर देताना जगनमोहन रे•ाr यांनी चंद्राबाबूंवर गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप केला होता.
तुपाची चाचणी होणार
एसआयटीने तपासाचा भाग म्हणून तिरुमला तिरुपती देवस्थानने खरेदी केलेल्या तुपाची गुणवत्ता आणि पुरवठा प्रक्रियेची पडताळणी सुरू केली आहे. याशिवाय तिरुपती-पूर्व पोलीस ठाण्यात राज्य सरकारने दाखल केलेल्या गुह्याचाही तपास सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तपासावर सीबीआय संचालक देखरेख ठेवणार आहेत. या तपास समितीमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय), आंध्रप्रदेश पोलीस आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचे (एफएसएसएआय) अधिकारीही समाविष्ट आहेत.