For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूरमधील 5 जणांच्या हत्येचा तपास एसआयटीकडे

06:40 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
मणिपूरमधील 5 जणांच्या हत्येचा तपास एसआयटीकडे
Advertisement

मुख्यमंत्री बिरेन सिंह यांची घोषणा : मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरमध्ये चालू आठवड्याच्या प्रारंभी झालेल्या 5 जणांच्या हत्येचा तपास एसआयटी करणार आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख ऊपये देण्याची घोषणा करत मुख्यमंत्र्यांनी शांततेचे आवाहन केले आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी नुकतीच लिलोंग येथील घटनेत मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच थौबल जिल्ह्यातील लिलोंग चिंगजाओ भागात 1 जानेवारी रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली.

Advertisement

मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रचंड तणाव निर्माण झाला होता. नव्याने झालेल्या गोळीबाराच्या घटनेत पाच जणांची हत्या करण्यात आली होती. गोळीबारानंतर संतप्त जमावाने अनेक वाहने पेटवल्याने तणाव निर्माण झाला होता. गोळीबार आणि जाळपोळीचे सत्र सुरू झाल्यामुळे राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली होती. गोळीबार करून हल्ला करणाऱ्या बंदूकधाऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले असले तरी हा जातीय तणाव असल्याचा अंदाज समजून तपास हाती घेण्यात आला आहे. गोळीबारात घटनास्थळीच चौघांचा मृत्यू झाल्यानंतर अन्य एकाने उपचारादरम्यान प्राण सोडला होता. या घटनेत अन्य चार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मणिपूरमध्ये 3 मे 2023 रोजी जातीय हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून 185 हून अधिक लोक मारले गेले आहेत. तसेच शेकडो जखमी झाले आहेत.

Advertisement
Tags :

.