एसआयआरची शंका
देशभर सध्या वेगवेगळ्या आंदोलनांचा वणवा पेटल्याचे चित्र आहे. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीवरून मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक एकवटलेले दिसतात. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी केलेल्या परखड मतप्रदर्शनातून अप्रत्यक्षपणे एसआयआरच्या वैधतेविषयीच शंका उपस्थित होते.
महाराष्ट्रासह देशभर मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु, यातील अनेक त्रुटी समोर येताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे यातील विविध तरतुदींना अन्य दोन निवडणूक आयुक्तांचा विरोध असतानाही ज्ञानेशकुमार यांनी निर्णय पुढे रेटल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे निवडणूक आयुक्तांविरोधात देशभर असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यातूनच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आंदोलनांचे लोण पसरलेले पहायला मिळते. दिल्लीतील जंतर मंतर, इंडिया गेट आणि संसद मार्ग पोलीस ठाणे अशा तीनही परिसरात रविवारी आंदोलनांची धग पहायला मिळाली. काँग्रेसची एनएसयूआय, आयवायसी, डावे पक्ष व त्यांच्या एफएसआय, एआयएसए याशिवाय आप व विविध पक्ष व त्यांच्या संघटना यांचा यामध्ये हिरीरिने सहभाग दिसून आला. या आंदोलनाची तीव्रता पाहता त्याकडे निश्चितपणे जंतरमंतर-टू म्हणूनच पहावे लागेल. मुंबईतही ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादीसह शेकाप व डावे पक्षही सहभागी झाल्याने एसआयआरविरोधात महाराष्ट्रातदेखील मोठा असंतोष असल्याचे स्पष्ट होते. वास्तविक, सध्याच्या सरकारमध्ये सर्वज्ञ मंडळींचा विपुल भरणा आहे. हाच दृष्टीकोन अधिकाऱ्यांपर्यंत झिरपत गेलेला दिसतो. त्यामुळे चूक मान्य करण्याचा वा सुधारण्याचा प्रश्नच येत नाही. त्यातूनच अशा प्रकारची (सीजेपी वा तत्सम) जनआंदोलने उभी राहत आहेत. आता हे आंदोलन तीव्र होत असताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर कोरडे ओढलेले पहायला मिळतात. ‘कोट्यावधी नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणारी कोणतीही प्रक्रिया मूलभूतपणे मनमानी आणि घटनात्मक व्यवस्थेचे उल्लंघन करणारी आहे,’ हे न्यायमूर्तींचे परखड मतप्रदर्शन आयोगाच्या एकूणच कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करते. वास्तविक, लोकशाहीमध्ये मतदान हा पवित्र अधिकार मानला जातो. हा पवित्र अधिकार प्रत्येकाने बजावावा, यासाठी वर्षानुवर्षे सरकार तसेच विविध सामाजिक संस्था जनजागरण करत आल्या आहेत. परंतु, मतदारयादी शुद्धीकरणाच्या नावाखाली मागच्या काही दिवसांपासून ज्या गोष्टी केल्या जात आहेत, त्या विपरित व लोकशाहीचा संकोच करणाऱ्याच ठरतात. न्यायमूर्तींच्या सांप्रत विधानातून हाच अर्थ ध्वनित होतो. एखाद्या प्रक्रियेमुळे लाखो भारतीय नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहत असतील, आपल्याच देशात त्यांना दुय्यम नागरिक बनावे लागत असेल, तर अशी प्रक्रिया मनमानीच म्हणावी लागेल. वेगवेगळे दाखले देऊन त्याचे समर्थन कदापि करता येणार नाही. कारण यातून अंतिमत: संविधानाच्या गाभ्यावरच आघात होतो, असे न्यायमूर्ती म्हणतात. ते रास्तच. मुळात मतदारयादीतून मृत व्यक्ती, दुबार नावे वगळलीच पाहिजेत. परंतु, त्या आडून विद्यमान मतदारांची नावे वगळली जात असतील, तर तो एकप्रकारे गंभीर गुन्हाच ठरतो. पूर्वसूचना न देता आणि आपली बाजू मांडण्याची संधी न देता मतदारयादीतून कोणत्याही विद्यमान मतदाराचे नाव वगळले जाऊ शकत नाही, असे स्वत: न्यायमूर्तींनीच स्पष्ट केले आहे. म्हणूनच त्यातून आयोगाने योग्य तो बोध घ्यावा. मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षणाअंतर्गत घरोघरी भेटी दिल्या जातील व पडताळणी करण्यात येईल, असे प्रारंभी सांगण्यात आले. पण, अनेक भागांत बीएलओ प्रत्यक्षात पोहोचलेच नाहीत. फॉर्म 6 वरून तर अखेर आयोगालाच माघार घ्यावी लागली. आता एसआयआरच रद्द करण्याची मागणी जोर धरते आहे. पारदर्शकतेअभावीच हे शंकेचे मोहोळ उठलेले दिसते.
