ट्रेव्हिस हेडशी पंगा पडला महागात, आयसीसीचा सिराजला दणका
डिमेरीट पाँईटसह सामन्याच्या फीमध्ये 20 टक्के कपात
वृत्तसंस्था/ अॅडलेड
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज व ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रेव्हिस हेड यांच्यातील स्लेजिंगचा किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे. अॅडलेड येथील दुसऱ्या कसोटीत हेडला बाद केल्यानंतर सिराजने हातवारे करत जल्लोष साजरा केला होता. मग ट्रेव्हिस हेडही त्याला खुन्नस देत काहीतरी बोलला. स्लेजिंगनंतर या दोघांत सामना संपल्यानंतर दिलजमाईचा सीनही पहायला मिळाला. पण, चुकीला माफी नाही असे म्हणत जे वर्तन या दोघांनी केले ते चुकीचे आहे असे सांगत आयसीसीने या दोघांवर कारवाई केली आहे. पण, या कारवाईचा मोठा फटका सिराजला बसला आहे.
आयसीसीने सांगितले की, सिराज आणि हेडला शिस्तभंगासाठी 1-1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे, जो गेल्या 24 महिन्यांतील त्यांचा पहिला गुन्हा आहे. सिराज आणि हेडची गेल्या 24 महिन्यांतील ही पहिलीच चूक होती. त्यामुळे कोणावरही बंदी घालण्यात आली नाही. दोघेही 14 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ब्रिस्बेन कसोटीत खेळू शकतात. पण, हेडसोबतचा पंगा सिराजला चांगलाच महागात पडला आहे. आयसीसीने आचारसंहितेचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्याला कलम 2.5 अंतर्गत दोषी ठरवले आहे. त्यामुळे डिमेरिट पाँईटसह मॅच फीच्या 20 टक्के रक्कम दंडाच्या रुपात सिराजला भरावी लागणार आहे. दुसरीकडे, ट्रेव्हिस हेडला कलम 2.13 अंतर्गत दोषी ठरवल्यामुळे त्याच्या नावे फक्त एक डिमेरिट पाँईट जमा झाला आहे.
दरम्यान, सिराज आणि हेड यांनी आपली चूक मान्य करत सामनाधिकारी रंजन मदुगले यांच्यासमोर आरोप मान्य केले आहेत. त्यामुळेच सुनावणीची गरज भासली नाही. अशा परिस्थितीत आयसीसीने दोघांनाही दोषी ठरवून शिक्षा सुनावली.