‘एसआयआर’ ला 6 राज्यांमध्ये मुदतवाढ
पश्चिम बंगालचा समावेश नाही : आयोगाचा निर्णय
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाने सहा राज्यांमधील ‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षण’ (एसआयआर) कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तसेच अंदमान आणि निकोबार बेटे यांच्यासाठी कालावधीत वाढ करण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या विनंतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयोगाच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ही पाच राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी इन्युमरेशन फॉर्म सादर करण्याचा अखेरचा दिनांक 11 डिसेंबर हा होता. तर 16 डिसेंबरला नव्या मतदारसूचीचे प्रारुप प्रसिद्ध केले जाणार होते. तथापि, आता हा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. पण पश्चिम बंगालचा अपवाद करण्यात आला आहे.
घोटाळ्याच्या घटना
केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहारमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अन्य 12 राज्यांमधील प्रक्रिया हाती घेतली आहे. येत्या पाच महिन्यांमध्ये जी चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत, त्यांचाही या 12 राज्यांमध्ये समावेश आहे. पण काही राज्यांमधून इन्युमरेशन फॉर्म भरण्याच्या संदर्भात घोटाळे घडत असल्याचे आयोगाच्या लक्षात आले आहे. मतदानासाठी अपात्र लोक मृत मतदारांच्या नावे फॉर्म्स भरुत देत आहेत. तसेच बांगला देशातून आलेले घुसखोरही भारतातील मृत मतदारांच्या नावे फॉर्म्स भरत आहेत. ज्या बूथ लेव्हल ऑफिसर्सचा (बीएलओ) मृत्यू झाला आहे. त्यांच्या लॉगइंनचा उपयोग करुन त्यांच्या बनावट स्वाक्षरीने बनावट मतदारांची नोंद केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकारांची तपासणी करण्यासाठी कालावधी वाढविल्याचे आयोगाच्या कार्यालयाकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.
पश्चिम बंगालचा अपवाद
पश्चिम बंगालच्या एसआयआरसाठी मात्र कालावधीवाढ देण्यात आलेली नाही. या राज्यात इन्युमरेशन फॉर्म्सची प्रक्रिया गुरुवारी रात्री 12 वाजता संपली आहे. बुधवारी संध्याकाळच्या माहितीप्रमाणे या राज्यात एकंदर 57 लाख 52 हजार 207 इतकी वगळण्यायोग्य नावे आढळली आहेत. त्यांच्यापैकी 24 लाख 14 हजार 750 मृत मतदारांची नावे आहेत. 19 लाख 89 हजार 914 नावे राज्याबाहेर स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे आहेत. तर 11 लाख 57 हजार 889 नावे बेपत्ता किंवा न सापडलेल्या मतदारांची आहेत. ऊर्वरित नावे दुहेरी (डुप्लिकेट) मतदारांची किंवा अन्य कारणांनी अपात्र झालेल्या मतदारांची आहेत. एकंदर मतदारांची संख्या 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत 7 कोटी 66 लाख 37 हजार 529 इतकी होती. या राज्यात ‘एसआयआर’ प्रक्रिया 4 नोव्हेंबर 2025 पासून हाती घेण्यात आली आहे. 16 डिसेंबर 2025 या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोग सुधारीत मतदारसूचीचे प्रारुप प्रसिद्ध करणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2026 या दिवशी अंतिम सुधारित मतदारसूची प्रसिद्ध केली जाणार आहे. नंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या निवडणुका एकाचवेळी होणार आहेत.
6 प्रदेशांचे नवे वेळापत्रक
क्रमांक राज्य किंवा प्रदेश इन्युमरेशक कालावधी प्रारुप प्रसिद्धी
तामिळनाडू 14-12-2025 पर्यंत 19-12-2015
गुजरात 14-12-2025 पर्यंत 19-12-2025
मध्यप्रदेश 18-12-2025 पर्यंत 23-12-2025
छत्तीसगड 18-12-2025 पर्यंत 23-12-2025
अंदमान 18-12-2025 पर्यंत 23-12-2025
उत्तर प्रदेश 18-12-2025 पर्यंत 23-12-2025