महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये ‘एसआयआर’ला मुदतवाढ
पाच राज्यांमधील अंतिम मतदारयादी 30 नोव्हेंबरला येणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार, महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये 30 नोव्हेंबर रोजी आणि दिल्लीत 22 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर हा बदल करण्यात आला असून त्यामध्ये वगळलेल्या मतदारांना दावे आणि आक्षेप दाखल करण्यासाठी पुरेशी संधी देण्यावर आणि प्रक्रियेत घाई टाळण्यावर भर देण्यात आला आहे.
एसआयआर प्रक्रियेसंदर्भात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आता महाराष्ट्रातील एसआयआरची तारीख वाढवली आहे. सुधारित अंतिम मतदार यादी आता 30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. आयोगाने इतर पाच राज्यांसोबत यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे आणि आक्षेप दाखल करण्याची तारीख 31 ऑगस्ट 2026 वरून 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, सूचना आणि दावे व आक्षेपांवर प्रक्रिया करण्याची मुदत 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत असेल. त्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश देताना सुधारित वेळापत्रक तात्काळ जनतेपर्यंत पोहोचवावे आणि राज्यात त्याचा वेगाने प्रचार करण्याची सूचना केली आहे. साहजिकच या निर्देशांमुळे आता अंतिम तारीख पुन्हा पुढे वाढवली जाणार नाही असे मानले जात आहे.
एसआयआरच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, उत्तराखंड आणि दिल्लीसह 16 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवले जात आहे. तिसऱ्या टप्प्यात एसआयआर होत असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मतदार आहेत. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमध्ये सर्वात कमी मतदार आहेत. या कालावधीत 36.73 कोटी मतदारांची पडताळणी केली जाईल. एसआयआरच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दहा राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आधीच झाला आहे. एसआयआरच्या तिसऱ्या टप्प्यानंतर हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख वगळता देशभरात एसआयआर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. खराब हवामान आणि जनगणनेमुळे, उर्वरित तीन राज्यांसाठी एसआयआरचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.
