जीव वाचविण्यासाठी सिनवारचे वेषांतर
महिलांचे कपडे परिधान करून पलायन
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलचा सर्वात मोठा शत्रू याह्या सिनवार हा गाझापट्टीतील दहशतवाद्यांच्या भुयारांच्या नेटवर्कमधून बाहेर पडला होता. यादरम्यान त्याने इस्रायलच्या सैन्यापासुन वाचण्यासाठी महिलांचे कपडे परिधान केले होते असे समोर आले होते. सिनवारने आता स्वत:चा जीव वाचविण्यासाठी भुयारांच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक वर्षांपासून तो या भुयारांच्या जाळ्यातच लपून बसला होता.
गाझाचा लादेन म्हणून ओळखला जाणारा सिनवार हा 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा सूत्रधार आहे. हमास प्रमुख हानियेहची इराणमध्ये हत्या झाल्यावर सिनवारच हमासच्या राजकीय शाखेचा प्रमुख झाला आहे. सिनवार आता गाझापट्टीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात स्वत:चा जीव वाचवू पाहत आहे. इस्रायलच्या सैन्याने जुलै महिन्यात हमासच्या सैन्य शाखेचा प्रमुख मोहम्मद दीफला ठार केले होते. दीफ आणि इस्माइल हानियेहच्या मृत्यूनंतर आता इस्रायलचा सर्वात मोठा शत्रू सिनवार हाच आहे.
इस्रायलचे सैन्य गाझापट्टीवरील स्वत:चे नियंत्रण मजबूत करत असल्याने सिनवारला आता वारंवार स्थलांतर करावे लागत आहे. स्वत:ला ट्रॅक केले जाऊ नये म्हणून सिनवार स्वत:च्या सहकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी पत्राचा वापर करत आहे. ही पत्रं त्याचा खास हस्तक योग्य ठिकाणी पोहोचवित आहे. सिनवारला कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर भरवसा नाही. याचबरोबर सिनवार शस्त्रसंधीच्या अंतर्गत स्वत:ला जीवनदान मिळावे म्हणून प्रयत्नशील आहे.
अमेरिका-इस्रायलची शोधमोहीम
इस्रायल आणि अमेरिकेने याह्या सिनवारच्या शोधाकरता पूर्ण जोर लावला आहे. अमेरिकेने स्वत:ची सर्व साधनसामग्री सिनवारचा थांगपत्ता लावण्यासाठी एकवटली आहे. तर दुसरीकडे सिनवारचा शोध लावण्यासाठी इस्रायलने शिन बेट सुरक्षा एजेन्सी मुख्यालयाच्या आत एक विशेष शाखा निर्माण केली आहे.