सिनवारचा निकटवर्तीय मारवान इस्साचा खात्मा
सिनवारचा निकटवर्तीय मारवान इस्साचा खात्मा
वृत्तसंस्था/ तेल अवीव
गाझामध्ये युद्धविरामादरम्यान हमासला मोठा झटका बसला आहे. हमासचा कमांडर मारवान इस्सा हा इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेल्याची पुष्टी मिळाली आहे. हमास कमांडर मारवानचा मृत्यू हा गाझामध्ये युद्धविराम लागू होण्यापूर्वी इस्रायलने पेलल्या हवाई हल्ल्यात झाला आहे. हमासचा माजी सैन्यप्रमुख मोहम्मद दीफचा सहाय्यक राहिलेला मारवान इस्सा मारला गेल्याची पुष्टी हमासचा पदाधिकारी ओसामा हमदानने दिली.
मारवान हा दक्षिण इस्रायलवर 7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार होता असे इस्रायलने सांगितले आहे. हमासचा कमांडर मारला गेल्याची पुष्टी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनीही दिली आहे. इस्सा हा 2012 पासून हमासची सैन्य शाख कस्साम ब्रिगेडचा प्रमुख मोहम्मद दाइफचा सहकारी म्हणून काम करत होता. इस्साने अन्य एक वरिष्ठ कमांडर अहमद अल-जाबरीच्या मृत्यूनंतर ही भूमिका सांभाळली होती. इस्साने हमासच्या राजकीय कार्यालय तसेच सैन्य परिषदेत काम केले होते, ज्याची देखरेख समूहाचा प्रमुख याह्या सिनवार करत होता.