माद्रिद टेनिस स्पर्धेत सिनर विजेता
वृत्तसंस्था, माद्रिद (स्पेन)
रविवारी येथे झालेल्या 2026 च्या माद्रिद खुल्या एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या टॉपसिडेड जेनिक सिनरने एकेरीचे जेतेपद पटकाविताना जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेव्हचा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. जेनिक सिनरने वर्षभराच्या टेनिस कालावधीत सलग पाच मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धा जिंकल्या असून असा पराक्रम करणारा तो पहिला टेनिसपटू ठरला आहे.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात 24 वर्षीय सिनरने व्हेरव्हचा 6-1, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभ केला. हा अंतिम सामना 57 मिनिटे चालला होता. हार्टकोर्ट आणि क्लेकोर्टवर खेळविण्यात आलेल्या चालु वर्षीच्या टेनिस हंगामातील पहिल्या चार एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धा सिनरने जिंकल्या होत्या. आता तो पाचही एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाला होता. माद्रिद स्पर्धेत त्याने जेतेपद मिळवून टेनिस क्षेत्रात नवा इतिहास घडविला. सिनर आणि व्हेरेव्ह यांच्यात आजपर्यंत 14 सामने झाले असून त्यापैकी 10 सामने सिनरने तर चार सामने व्हेरेव्हने जिंकले आहेत. अलिकडच्या कालावधीतील सिनरचा व्हेरेव्हवरील हा सलग नववा विजय आहे. 2023 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत व्हेरेव्हने सिनरचा पराभव केला होता.