तालुक्याच्या पश्चिम भागातील घरांमध्ये सिंगल वीजपुरवठा बंद
शिवारातील घरांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : हेस्कॉमचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचे निवेदन
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील वाघवडे, किणये परिसरातील शेतकऱ्यांच्या शिवारातील घरांमध्ये सिंगल विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना अभ्यास करणे अवघड झाले आहे. अंधारामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या मुलांचे भवितव्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे. वाघवडे, मच्छे, संतिबस्तवाड, रणकुंडये, किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी, नावगे, बामणवाडी, बाळगमट्टी भागातील शिवारातील सिंगल विद्युतपुरवठा बंद केला आहे. तसेच रात्रीच्या वेळी थ्री फेज विद्युतपुरवठा दिला जात आहे. सिंगल विद्युत पुरवठा शेत शिवारात द्यावा व दिवसा थ्री फेज विद्युतपुरवठा सुरळीत सुरू ठेवावा, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी हेस्कॉमचे मच्छे विभागीय कार्यालय येथे दिले आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना दिवसा विद्युत थ्री फेज विद्युत पुरवठा दिला जात नव्हता व रात्रीच्या वेळी शिवारातील सिंगल फेज पुरवठा खंडित केला जात होता. यामुळे जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यांमध्ये तीनवेळा हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तसेच संतिबस्तवाड क्रॉस मच्छे येथील हेस्कॉम विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत आंदोलन छेडले होते.
आंदोलनाच्या मागणीप्रमाणे शेत शिवारातील घरांमध्ये संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सिंगल विद्युत पुरवठा देण्यात येत होता. मात्र चार दिवसांपासून हा वीजपुरवठा बंद केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना रात्रीच्या वेळी अभ्यास कसा करावा, याची चिंता लागून राहिली आहे. शेतकऱ्यांनी बुधवारी हेस्कॉमच्या विभागीय अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला. दहावी व बारावीची परीक्षा झाली. त्यामुळे सायंकाळी 6 ते रात्री 10 हा सिंगल फेज विद्युतपुरवठा बंद केला आहे, असे हेस्कॉम अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र शेतकऱ्यांची मुले सीईटी, एनईईटी याचबरोबर पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतात. पुढील शिक्षणासाठी त्यांना परीक्षा द्यायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी अभ्यास कसा करावा?याकरिता सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सिंगल फेज विद्युतपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.दिवसा थ्री फेज विद्युतपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन हेस्कॉमचे अधिकारी दीपानंद यांच्याकडे देण्यात आले. यावेळी नारायण पाटील, नागनाथ बुवाजी, महादेव आंबोळकर आदींसह या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांची मागणी
थ्री फेज विद्युतपुरवठा
►सकाळी 7 ते दुपारी 12 वा. व दुपारी 3 ते 5.
सिंगल फेज विद्युतपुरवठा
►सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत