एकेरी तगर........
आकाशात पौर्णिमेचा चंद्र उगवला की त्या दिवशी अगदी आकाशामध्ये जल्लोष चालायचा. सगळ्या चांदण्यांना ग्रहगोलांना त्या ठिकाणी बोलवलं जायचं. सगळेजण रात्रभर दंगामस्ती, आरडाओरडा, खेळ खेळत वेळ घालवायचे. चंद्राच्या भोवती सगळे फेर धरायचे. ग्रह, तारे, चांदण्या, नक्षत्र सगळे सगळे खेळायला यायचे. उशिरा फक्त यायची ती शुक्राची चांदणी.. तिला काही केल्या जागंच यायची नाही. धूमकेतू मात्र शेपटी हलवत कुठे पळून जायचा कोणास ठाऊक. शनि मात्र आपल्या भोवती असलेल्या कड्यामध्ये हेलकावे खात डुलत डुलत अंगाभोवती गोल गोल फेऱ्या मारत राहायचा. आज सगळ्या चांदण्यांनी ठरवलं आपण शुक्राच्या चांदणीला भेटायला जायचं. मग त्या खेळता खेळता तिच्या घरी जायला निघाल्या. ती राहते कुठे? माहिती नव्हतं. सगळ्यांनी आपल्या डोक्यावर असलेला दिवा सुरू केला आणि निघाल्या शुक्राच्या चांदणीच्या घरी. चालता चालता त्या इतक्या दमून गेल्या की त्यांचे डोळे जड व्हायला लागले. झोप यायला लागली. पण आता ठरल्याप्रमाणे जायलाच हवं म्हणून त्या चालतच निघाल्या. आता त्यांना समोरचा रस्ता अंधूक दिसायला लागला. त्यांच्या डोक्यावरच्या दिव्याचा उजेड हळूहळू कमी व्हायला लागला होता. कारण त्यांना वरदानच होतं सूर्याची किरणं यायला लागली की तुमच्या दिव्याचा प्रकाश बंद होणार! त्यांच्या ही गोष्ट लक्षातच आली नाही. त्या चालता चालता थकून जिथे बसायच्या तिथेच त्यांना झोप लागायची. असं करत करत त्यापुढे निघाल्या होत्या, आणि मग नंतर त्यांना आता रस्ता दिसेनासा झाला. आता शुक्राच्या चांदण्याचं घर खरंतर जवळच आलं होतं. पण बहुतेक सगळ्या चांदण्यांच्या डोक्यावरच्या दिव्याचा प्रकाश कमी झाल्यामुळे त्यांना पुढचे रस्ते दिसेनासे झाले. त्या तशाच दमून कुठे कुठे बसल्या आणि तिथेच झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांच्या अंगावरती काहीतरी थंडगार पडलं.हळूच डोळे उघडून पाहिलं तर ते दवबिंदूंचे कण होते आणि समोर सूर्यप्रकाश त्यांना हळुवार हाताने कुरवाळत बसलेला होता. त्यांना कळेच ना, आपण कुठे आलो ते आणि मग सूर्यकिरणांनी हळूवार हातांनी कळ्यांना हळुच स्पर्श करून छान उमलवलं. पांढऱ्याशुभ्र रंगाची ....‘एकेरी तगर’ त्यालाच कोणी चांदणीची फुलं असे देखील म्हणतात. चांदण्या आता हिरव्या झाडांवर फुलं बनून विराजमान झाल्या होत्या..अशीही चांदणीची फुलं..!