For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

06:47 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
Advertisement

वृत्तसंस्था/ सिंगापूर

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे मंगळवारपासून सुरु होणाऱ्या 850,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या सिंगापूर खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू सहभागी होणार आहेत. आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सदर स्पर्धा बॅडमिंटनपटूंना सरावाकरीता महत्त्वाची आहे. या स्पर्धेत भारताची पीव्ही सिंधू, एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला आता केवळ दोन महिने बाकी आहेत. या स्पर्धेपूर्वी विश्वबॅडमिंटन फेडरेशनच्या आणखी तीन महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. ऑस्ट्रेलियन खुली सुपर 500, इंडोनेशिया सुपर 1000 आणि कॅनडा खुली सुपर 500 दर्जाच्या स्पर्धा पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी होणार आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळविणारी भारतीय जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी सिंगापूर स्पर्धेत जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करतील. गेल्या रविवारी झालेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणॉय यांच्याकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय बॅडमिंटनपटूंनी आता सरावावर अधिक भर दिला आहे. सुपर 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धांमध्ये अव्वल बॅडमिंटनपटूंची सत्वपरीक्षा ठरत असते. नुकत्याच झालेल्या मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचे जेतेपद थोडक्यात हुकले. आता ती सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा नव्या जोमाने जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या टूरवरील स्पर्धेत सिंधूने जवळपास एक वर्षानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत दोन वेळेला पदक मिळविणाऱ्या सिंधूचा या स्पर्धेतील सलामीचा सामना डेन्मार्कच्या लिने कॅजरफेडशी होणार आहे. हा सामना सिंधूने जिंकला तर तिची या स्पर्धेत गाठ रिओ ऑलिम्पिक विजेती स्पेनच्या कॅरोलिना मॅरिनशी पडेल, असा अंदाज आहे.

Advertisement

पुरुष दुहेरीच्या मानांकनात अग्रस्थानावरील जोडीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी बँकॉकमधील स्पर्धेत एकही गेम न गमाविताना विजेतेपद मिळविले होते. ही जोडी चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांच्याकडून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. सिंगापूर स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांचा पहिल्या फेरीतील सामना डेन्मार्कच्या लुंडगार्ड आणि वेस्टरगार्डशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये भारताच्या लक्ष्य सेनने फ्रेंच खुल्या आणि अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पाठोपाठ उपांत्य फेरी गाठत पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट यापूर्वीच निश्चित केले आहे. सिंगापूर स्पर्धेत लक्ष्य सेनला टॉप सिडेड व्हिक्टर अॅक्सेलसनशी लढत देताना थोडे अवघड जाईल. अॅक्सेलसनने रविवारी मलेशियन बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. त्याचप्रमाणे भारताच्या एच. एस. प्रणॉयचा सलामीचा सामना बेल्जियमच्या कॅरेगीशी होणार आहे. किदांबी श्रीकांतचा सलामीचा सामना जपानच्या नाराओकाशी तर प्रियांशु राजवतचा सलामीचा सामना हाँगकाँगच्या ली ईयुशी होणार आहे. महिला एकेरीत आकर्षी कास्यपचा पहिल्या फेरीतील सामना थायलंडच्या चिकीवाँगशी तसेच पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळविणाऱ्या अश्विनी पोनाप्पा आणि तनिशा क्रेस्टो यांचा महिला दुहेरीतील सलामीचा सामना युक्रेनच्या जोडी बरोबर होणार आहे. ट्रेसा जॉली व गायत्री गोपीचंद यांची सलामीची लढत चीन तैपेईच्या जोडी बरोबर होईल.

Advertisement
Tags :

.