सिनेर, रुने यांची ऑलिंपिकमधून माघार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
इटलीचा टॉपसिडेड टेनिसपटू जेनिक सिनेर तसेच डेन्मार्कचा होल्गर रुने यांनी शुक्रवार दि. 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतून माघार घेतली आहे. या दोन्ही टेनिसपटूंना दुखापती झाल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. एटीपीच्या ताज्या मानांकनात सिनेर हा सध्या पहिल्या स्थानावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. अलिकडेच सिनेरला घसादुखीची समस्या जाणवल्याने त्याने वैद्यकीय तपासणी करुन घेतली. या तपासणीत त्याला
टॉन्सील्सची बाधा झाल्याचे आढळून आले. पॅरिस ऑलिंपिकमध्ये जेतेपद मिळविण्याचे त्याचे स्वप्न होते. पण तंदुरुस्तीच्या समस्येमुळे त्याला पॅरिस ऑलिंपिकला मुकावे लागत आहे. पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इटलीच्या पथकाला सिनेरने शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टरांनी आपल्याला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिल्याचे सिनेरने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 2024 च्या टेनिस हंगामात सिनेरच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे. त्याने या कालावधीत एटीपी टूरवरील स्पर्धांमध्ये विक्रमी 42 सामने जिंकले असून केवळ 4 सामने गमविले आहेत. तसेच त्याने गेल्या जानेवारीत रशियाच्या मेदव्हेदेवला पराभूत करुन ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली तर फ्रेंच ग्रँडस्लॅममध्ये उपांत्य फेरी गाठली होती.