‘सिंदूर’मुळे सांगितल्यापेक्षा अधिक हानी
पाकिस्तानकडून स्पष्ट कबुली, अन्य आठ तळ नष्ट
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
भारताच्या ‘सिंदूर’ अभियानामुळे पाकिस्तानची प्रचंड हानी झाली आहे. ही हानी आधी घोषित केलेल्या हानीपेक्षाही अधिक असून भारताने पाकिस्तानचे 11 नव्हे, 19 वायुतळ आणि लष्करी आस्थापने उध्वस्त केली आहेत, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानने दिली आहे. झालेल्या हानीचा अहवाल पाकिस्तानने तयार केला असून सर्व कागदपत्रे या अहवालात आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारताने पाकिस्तानच्या विविध तळांवर 7 मे, 8 मे आणि 9 मे च्या रात्री मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ले केले होते. पाकिस्तानने या हल्ल्यात उध्वस्त झालेल्या किंवा मोठ्या प्रमाणात हानी पोहचलेल्या सर्व तळांची माहिती आपल्या कागदपत्र संचात दिली आहे. पाकिस्तानने प्रथम मान्य केलेल्या माहितीनुसार 7 मेच्या रात्री भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. तसेच नंतरच्या दोन रात्रींमध्ये पाकिस्तानच्या वायुसेनेचे आणि लष्कराचे 11 तळ उडविले होते. नंतर पाकिस्तानने या हानीची स्पष्ट कबुलीही दिली होती. मात्र, नव्या कागदपत्र संचात आणखी 8 तळांची हानी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आठ अन्य तळ कोणते...
पेशावर, झांग, सिंध प्रांतातील हैद्राबाद, पंजाब प्रांतातील गुजरात, तसेच गुजरनवाला, भावलनगर, अटक आणि चोर असे आणखी आठ तळ भारताने उध्वस्त केले आहेत, असे या कागदपत्रांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या स्थळांचे नकाशेही आणि उध्वस्त झालेल्या तळांची छायाचित्रेही या कागदपत्र संचात असून हा अहवाल पाकिस्तान प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.
ही नवी आठ स्थाने
भारताने सिंदूर अभियानाच्या अंतर्गत दिलेल्या माहितीमध्ये या आठ स्थानांचा समावेश करण्यात आलेला नाही. भारताने दिलेल्या माहितीनुसार रावळपिंडीतील नूर खान वायुतळ, सरगोधा येथील मुशाफ वायूतळ, भोलारी वायुतळ, जाकोकाबाद येथील शाहबाझ वायुतळ आणि आणखी 7 तळांवर हल्ले करण्यात आले होते. त्यांच्यात बहावलपूर आणि मुरिदके येथील तळांचाही समावेश होता.
बहावरपूर येथे अधिक हल्ले
भारताने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा बहावलपूर येथील तळ उध्वस्त केला होता. येथील जामिया मशीद सुभान अल्ला हे या संघटनेचे मुख्यालयही ध्वस्त केले होते. या संपूर्ण तळाची हल्ल्याआधीची आणि हल्ल्यानंतरची उपग्रहीय छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती पाहिली असता, ही हानी केवढी मोठी आहे, याची कल्पना येते. भारताने लक्ष्य केलेल्या दहशतवादी तळांमधील 150 ते 170 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचेही स्पष्ट होत आहे.
एकंदर हानी किती...
पाकिस्ताननेच आता मान्य केलेल्या माहितीनुसार ‘सिंदूर’ अभियानात पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ आणि 19 वायुतळ आणि लष्करी तळ नष्ट झाले आहेत. त्यांच्यातील काही तळ पूर्णत: उध्वस्त झाल्याने त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रचंड वेळ आणि पैसा लागेल. 300 किलोमीटर आतपर्यंत भारताने क्षेपणास्त्रे डागून हानी केली आहे. ती 500 कोटी डॉलर्स (43 हजार कोटी रुपये) किंवा त्याहीपेक्षा जास्त असू शकते, असे अनुमान तज्ञांनी व्यक्त केले आहे.
‘सिंदूर’ थांबलेले नाही...
भारताचे ‘सिंदूर’ अभियान अद्याप थांबलेले नाही. पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढल्यास त्याचा दुसरा अध्याय हाती घेतला जाणार आहे. दहशतवादी हल्ला हे युद्ध म्हणूनच मानले जाईल, अशी स्पष्ट घोषणा भारताने याआधीच केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला कायम दबावाखाली ठेवण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.