सिंधूचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त
वृत्तसंस्था / कौलालंपूर (मलेशिया)
2026 च्या बॅडमिंटन हंगामातील विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू झालेल्या मलेशिया खुल्या सुपर 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत शनिवारी भारताची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. चीनच्या वेंग झीई हिने तिचा पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली.
महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात चीनच्या वेंग झीईने पी. व्ही. सिंधूचा 21-16, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. आतापर्यंत दोनवेळा ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या पी. व्ही. सिंधूची ही गेल्या ऑक्टोबरनंतरची पहिली स्पर्धा आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे तिने काही दिवस विश्रांती घेतली होती. आता पी. व्ही. सिंधू पुढील आठवड्यात दिल्लीत सुरू होणाऱ्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या इंडिया खुल्या 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत आपला सहभाग दर्शविणार आहे. सिंधूच्या पराभवामुळे मलेशियन बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. पुरूष दुहेरीत यापूर्वीच भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला होता.