सिंधुकन्या अक्साची ‘आर्चरी’मध्ये ‘नॅशनल लेव्हल’
राज्यस्तरीय स्पर्धेत ‘सुवर्ण लक्ष्यभेद’ करून आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज : अक्सा शिरगावकरचा कणकवली ते दिल्ली लक्षणीय प्रवास
स्वप्नील वरवडेकर/कणकवली
अक्सा मुदस्सर शिरगावकर हिचा जन्म आणि वास्तव्य सिंधुदुर्गसारख्या ग्रामीण भागातील. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गातील क्रीडा क्षेत्राला व त्यातही ‘आर्चरी’सारख्या खेळाला मर्यादा आहेत. मात्र, स्वत:सह आई-वडिलांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अक्सा ही धनुर्विद्या (आर्चरी) खेळातील ‘नॅशनल स्टार’ बनली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यस्तरीय स्पर्धेत ‘सुवर्ण लक्ष्यभेद’ केल्यानंतर सध्या ती सीबीएसई बोर्डातर्फे दिल्लीत राष्ट्रीय शालेय स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या कालावधीत अक्साने विविध स्पर्धांमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. पण, कणकवली ते दिल्लीपर्यंत झालेला अक्सा हिचा हा यशमय प्रवास प्रचंड मेहनतीने, संघर्षाने भरलेला आहे.
अक्सा ही कणकवलीतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची सातवीतील विद्यार्थिनी आहे. लहानपणापासूनच तिला स्विमिंग, सायकलिंगची आवड. दोन वर्षांपूर्वी वडील तथा शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगावकर, आई तथा बचतगटामध्ये प्रभावी काम करणाऱ्या सौ. तन्वीर शिरगावकर यांच्यासोबत उटी येथे फिरण्यासाठी गेलेल्या अक्सा हिला तेथील एका हॉटेलमध्ये धनुष्यबाण आणि शूटिंग रायफलचे ‘फनी गेम्स’ नजरेत पडले. सहजपणे धनुष्य हाती घेऊन बाण सोडायला लागली, तर नेम अचूक लागायला लागले. तेथील उपस्थितांमधूनही अक्साचे कौतुक होऊ लागले आणि येथूनच अक्साला ‘आर्चरी’ भावली.
साताऱ्यातील कॅम्प आणि प्रशिक्षकांची भेट
कणकवलीत परतलेल्या अक्साने आई-वडिलांकडे ‘आर्चरी’चे प्रशिक्षण घेण्याचा हट्ट धरला. वडील मुदस्सर, आई तन्वीर यांनी माहिती घेतली असता, कणकवलीत कुलकर्णी नावाचे एक प्रशिक्षक ‘आर्चरी’चे ‘बेसीक’ धडे देत असल्याचे समजले. त्यानुसार अक्साने कुलकर्णी यांना गाठले. अक्सा हिच्यातील ‘स्किल’ कुलकर्णी यांनाही भावले. त्याचवेळी सातारा येथे होत अलेल्या आठ दिवसांच्या ‘आर्चरी कॅम्प’बाबत कुलकर्णी यांनी सूचविले. याच कॅम्पमध्ये गेलेल्या अक्साला ‘आर्चरी’चे प्रतिथयश प्रशिक्षक प्रवीण सावंत भेटले. सावंत यांची झालेली भेट अक्साच्या क्रीडामय प्रवासाला महत्वपूर्ण वळण देऊन गेली.
अखेर कायमस्वरुपी साताऱ्यात वास्तव्य
प्रवीण सावंत यांनाही अक्सा हिची ‘बॉडी लँग्वेज’, ‘फिटनेस’, ‘नेमबाजी’तील कौशल्य भावले. अक्सामध्ये ‘नॅशनल स्पोर्टस्मन’ होण्याची क्षमता आहे. मात्र, त्यासाठी तिला चांगल्या ‘अॅकॅडमी’मध्ये राहून कठोर मेहनत घेणे गरज असल्याचे सावंत यांनी अक्सा हिच्या आई-वडिलांच्या निदर्शनास आणले. सिंधुदुर्गमध्ये अशी अॅकॅडमी नसल्याने अखेर अक्सा हिला सातारा येथेच सावंत यांच्या अॅकॅडमीमध्ये ठेवण्याचा निर्णय अक्साच्या आई-वडिलांनी घेतला. अक्सा कणकवलीतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी असून तिचे शिक्षण येथेच सुरू ठेवायचे, ती सातारा येथे राहणार असल्याने दिवसातील किमान दोन तास तिला ‘ऑनलाईन’ खासगी शिकवणी लावण्याचा निर्णयही आई-वडिलांनी घेतला.
...अन् अॅकॅडमीत प्रचंड मेहनत सुरू
11 वर्षांची, घराबाहेर कधीही न राहिलेली, ऐश आरामात वाढलेली मुलगी साताऱ्यातील त्या अॅकॅडमीत एकटी कशी राहणार, हाही प्रश्न होता. मात्र, अक्साने तेही आव्हान स्वीकारले. या अॅकॅडमीत स्वत:ची कामे स्वत:च करण्याच्या नियमाशीही तिने अवघ्या काही दिवसांमध्येच जुळवून घेतले. अखेर काही दिवसांनी, सहा महिन्यांपूर्वी अक्साच्या स्पर्धात्मक खेळाला प्रारंभ झाला.
राज्यस्तरीय स्पर्धेत ‘सुवर्ण लक्ष्यभेद’
‘आर्चरी’मध्ये ‘रिकर्व्ह’, ‘कंपाऊंड’ आणि ‘इंडियन’ असे तीन प्रकार आहेत. अक्सा या तिन्ही प्रकारांमध्ये ‘प्रॅक्टिस’ करत होती. मात्र, अधिक भावलेल्या ‘कंपाऊंड’ प्रकारामध्ये ती स्पर्धेत खेळायला लागली. याची सुरुवात महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या 13 वर्षांखालील जिल्हास्तरीय स्पर्धेने झाली. सिंधुदुर्गचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या अक्साला सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धकच नव्हता. त्यामुळे तिची सातारा येथे झालेल्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. तेथे प्रथम आलेल्या अक्साची अमरावती येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. याच स्पर्धेत अक्साने आपल्या 13 वर्षांखालील गटात पहिल्या-वहिल्या ‘गोल्ड मेडल’ला गवसणी घातली.
आता राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी
दरम्यान, महिनाभरापूर्वी सातारा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे 14 वर्षांखालील स्पर्धेत सहभागी होऊन अक्सा हिने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत विभागीयस्तरावर ‘ब्रॉन्झ मेडल’ मिळवित नांदेड येथील राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवून तेथे ‘टॉफ फोर’मध्ये स्थान मिळविले. तर याचवेळी सीबीएसई बोर्डातर्फे पुणे येथे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली. याच स्पर्धेत अक्सा हिने कणकवलीतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्रतिनिधीत्व करत ‘टॉफ फाईव्ह’मध्ये स्थान मिळविले. या यशामुळे तिची नवी दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा 24 ऑक्टोबरला सुरू झाली आहे.
आता वेध आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे
अक्सा हिच्या यशामागे प्रचंड जिद्द, मेहनत, संघर्ष आहेच. पण, आई सौ. तन्वीर, वडील मुदस्सर यांची इच्छाशक्तीही तेवढीच प्रबळ आहे. ‘आर्चरी’ खेळासाठी लागणाऱ्या धनुष्याची किंमत जवळपास साडेचार लाख रुपये असून प्रत्येक बाण चार ते पाच हजार रुपये किंमतीचा असतो. हे सर्व साहित्य तिच्या कुटुंबियांना इटलीतून मागवावे लागले. एकीकडे आपापल्या व्यवसायात गुंतलेले मुदस्सर, तन्वीर हे मुलीच्या ‘करियर’साठी मात्र, भरपूर वेळ देत आहेत. यापुढे ती आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही चमकेल, अशी अपेक्षा तिचे आई-वडील करत आहेत. अक्साची ही यशमय कहाणी केवळ सिंधुदुर्गवासीयांसाठीच नव्हे, तर ‘स्पोर्टस्’मध्ये करिअर घडवू इच्छीणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.