For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गचा ‘पॉकेट डायनामाईट’ बबल नाईक

06:00 AM Jul 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिंधुदुर्गचा ‘पॉकेट डायनामाईट’ बबल नाईक
Advertisement

लेख - रविकिरण परब, सावंतवाडी

Advertisement

लाल मातीचा धगधगता अंगार, मैदानावर धावांचा महापूर आणि फिल्डिंगमध्ये चित्त्याची रफ्तार.. ही ओळख आहे वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावचा सुपुत्र, सिंधुदुर्गच्या टेनिस क्रिकेटचा ‘पॉकेट डायनामाईट’ बबल नाईक याची! सिंधुदुर्गच्या स्थानिक मैदानांवरून सुरू झालेला त्याचा हा झंझावात आज देशाच्या क्रीडा क्षितिजावर लख्ख प्रकाशात आहे. दर्शन बांदेकरनंतर जिह्यातील टेनिस क्रिकेट समर्थपणे पुढे नेणारा ‘बबल’ म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातील एक आक्रमक आणि अस्सल ‘मॅच विनर’ ठरतोय. नुकत्याच राजस्थानातील जयपूरमध्ये पार पडलेल्या कवल प्रिमीयर लीगमध्ये (ख्झ्थ्) चार सामन्यात सर्वाधिक 89 धावा करत ‘बेस्ट बॅस्टमन’चा किताब त्याने जिंकला आहे. विशेष म्हणजे 51 हजार रु. चे पारितोषिक भारतीय क्रिकेटीयर इशान शर्माच्या हस्ते त्याला प्रदान करण्यात आले.

राज्याच्या ‘हाय-प्रोफाइल’ स्पर्धांवर बबलने आपली मोहोर उमटवल्यानंतर आता प्रतिष्ठेच्या आणि ग्लॅमरस अशा इंडियन स्ट्रीट प्रिमीयर लीगच्या (घ्एझ्थ्) महामंचावर बबलने आपल्या बॅटची जादू दाखवावी, हीच प्रत्येक सिंधुदुर्गवासीयाची तीव्र इच्छा आहे. आपल्या अचाट कौशल्याच्या जोरावर तो आज घ्एझ्थ् चे दार खणखणीतपणे ठोठावत आहे आणि ती सोनेरी संधी आता फार दूर नाही!

Advertisement

सिंधुदुर्ग आणि क्रिकेटचं नातं वेगळं सांगायला नको. या मातीने अनेक खेळाडू टेनिस क्रिकेटला दिले आहेत. सध्याच्या वेगवान टेनिस क्रिकेट विश्वात सिंधुदुर्ग जिह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर अभिमानाने उंचावण्याचे काम 24 वर्षीय बबल सन 2017 पासून समर्थपणे पेलत आहे. आपल्या आक्रमक फलंदाजी आणि अफलातून क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्याने टेनिस क्रिकेटचा एक नवा ‘सुपरस्टार’ म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सिंधुदुर्गच्या स्थानिक मैदानांवरून सुरू झालेला त्याचा हा प्रवास आज राज्यातील सर्वात मानाच्या आणि ‘हाय-प्रोफाइल’ स्पर्धांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

सिंधुदुर्गचा बाहुबली दाजी नाईक व टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार दर्शन बांदेकर यांना बबल आदर्श मानतो. देशातील सर्वाधिक लोकप्रिय ‘सुप्रिमो’ स्पर्धेत पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा पराक्रमही बबलच्या नावावर आहे. कासार्डे उत्तर गावठण येथील स्पर्धेत अवघ्या 22 चेंडूत 76 धावा ही त्याची आतापर्यंतची सर्वोच्च खेळी आहे. आतापर्यंत 17 अर्धशतके बबलच्या नावावर आहेत. राजस्थान-जयपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कवल प्रिमीयर लीगमध्ये (ख्झ्थ्) ‘बेस्ट बॅस्टमन’चा पुरस्कार त्याने जिंकला. सिंधुदुर्गचा कॅप्टन गोपाळ बटा याच्याकडूनही आपल्याला क्रिकेटबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन मिळते, असे बबल सांगतो.

बबल नाईक मैदानात उतरला की, गोलंदाजांच्या गोटात घबराट नक्की, हे समीकरण आता टेनिस क्रिकेटप्रेमींच्या पक्के अंगवळणी पडले आहे. त्याची चेंडूवर प्रहार करण्याची नैसर्गिक शैली आणि कठीण प्रसंगात संयम राखून सामना जिंकून देण्याची क्षमता अद्वितीय आहे. केवळ फलंदाजीच नव्हे, तर गरजेच्या वेळी भेदक गोलंदाजी करून सामन्याचा फासा पलटवण्यात बबलचा हातखंडा आहे. त्याच्या याच अष्टपैलू कामगिरीमुळे महाराष्ट्रातील अनेक दिग्गज संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असतात. सिंधुदुर्गातील लाल मातीच्या मैदानावर मित्रांसोबत खेळताना बबलमधील ‘टॅलेंट’ स्थानिक जाणकारांनी ओळखले. सुऊवातीच्या काळात मर्यादित साधनांसह आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्याने आपला सराव सुरू ठेवला. आपल्या कौशल्याच्या जोरावर त्याने अल्पावधीतच जिल्हा पातळीवरील स्पर्धा गाजवल्या. त्यानंतर मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि गोव्यातील मोठ्या स्पर्धांमध्ये अवघ्या काही वर्षांतच ‘सुपरस्टार’ हे बिऊद सार्थ ठरवले.

सिंधुदुर्ग जिह्यात गुणवान खेळाडूंची कमतरता नाही, मात्र योग्य सराव आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही कोणत्याही मोठ्या स्तरावर चमकू शकता, असा संदेश बबल नेहमी आपल्या कृतीतून तऊण पिढीला देत असतो. स्वत:ला शारीरिकदृष्ट्या फिट ठेवण्यासाठी तो करीत असलेली मेहनत आजच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. सिंधुदुर्गच्या या सुपुत्राने टेनिस क्रिकेटमध्ये मिळवलेले हे यश केवळ त्याचे वैयक्तिक यश नसून संपूर्ण जिह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. भविष्यातही त्याचा हा विजयी रथ असाच पुढे सुरू राहील आणि तो सिंधुदुर्गचे नाव देशपातळीवर रोशन करेल, असा विश्वास कोकणातील क्रीडा रसिकांकडून व्यक्त केला जात आहे.

‘इन्स्टा’वरही बबलची क्रेझ

आज सोशल मीडियाच्या युगात बबल नाईकची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. तो ज्या स्पर्धेत खेळतो, तिथे त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तऊण क्रिकेट रसिकांची मोठी गर्दी जमते. इतकी लोकप्रियता मिळूनही बबलचे पाय आजही जमिनीवर आहेत. मैदानावरील त्याची खिलाडूवृत्ती आणि नवख्या खेळाडूंना मदत करण्याची वृत्ती यामुळे तो सर्वांचा लाडका खेळाडू बनला आहे.

Advertisement
Tags :

.