सिंधुदुर्ग जि.प. समाजकल्याण अधिकारीपदी बालाजी चांडोळकर रुजू; तब्बल 15 वर्षांनंतर समाजकल्याण विभागाला मिळाला पूर्णवेळ अधिकारी
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारीपदी बालाजी नंदकुमार चांडोळकर यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यामुळे तब्बल 15 वर्षांनंतर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे.
बालाजी चांडोळकर हे नांदेड जिल्ह्यातील असून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात थेट नियुक्ती करण्यात आली. त्यांनी समाजकल्याण अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्याने विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला आता गती मिळण्याची अपेक्षा आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकारी पद 2011 पासून रिक्त होते. या कालावधीत विविध विभागांतील अधिकाऱ्यांकडे या पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात येत होता. त्यामुळे समाजकल्याण विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू होता.
आता 2026 मध्ये तब्बल 15 वर्षांनंतर या विभागाला पूर्णवेळ समाजकल्याण अधिकारी मिळाल्याने समाजकल्याण योजनांची अंमलबजावणी, लाभार्थी प्रकरणे तसेच विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.