For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सिंधुदुर्गात जलसंधारणाला वेग; दोन दिवसांत 859 बंधारे पूर्ण, 5,700 हेक्टर शेतीचे पंचनामे; जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल

01:03 PM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिंधुदुर्गात जलसंधारणाला वेग  दोन दिवसांत 859 बंधारे पूर्ण  5 700 हेक्टर शेतीचे पंचनामे  जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल
Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाने जलसंधारण आणि शेतकरी मदतीच्या उपाययोजनांना युद्धपातळीवर गती दिली आहे. पाणी अडविण्यासाठी बंधारे उभारण्याबरोबरच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. अवघ्या दोन दिवसांत जिल्ह्यात 859 कच्चे व वनराई बंधारे पूर्ण करण्यात आले असून, 15 हजार 563 शेतकऱ्यांच्या 5,700 हेक्टर शेतीक्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

Advertisement

पुढील आठ दिवसांत जिल्ह्यात 10 हजार 500 बंधारे उभारण्याचे, तसेच तब्बल 51 हजार 185 हेक्टर शेतीक्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती तुकाराम उर्फ दादा साईल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

उपाध्यक्षांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला राज्य कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बडे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी दिशांत कोळप, सहायक कृषी विकास अधिकारी सचिन कांबळी आणि पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. रवींद्र दळवी उपस्थित होते.

Advertisement

जलसंधारणासाठी बंधारे उभारणीला गती

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उपलब्ध पाणीसाठा जतन करण्यासाठी कच्चे आणि वनराई बंधारे उभारण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत तसेच राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून 150 बंधारे, तर पशुसंवर्धन विभागामार्फत 100 बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पुढील काळात पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकाधिक पाणी अडविणे आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढविणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

51 हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्याचे उद्दिष्ट

पावसाअभावी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 15 हजार 563 शेतकऱ्यांच्या 5,700 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

आता जिल्ह्यातील एकूण 51 हजार 185 हेक्टर शेतीक्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

पशुधनासाठी 75 हजार किलो मका बियाणे

जिल्हा परिषदेने पशुधनासाठी चारा व्यवस्थापनावरही विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सिंधुदुर्गात सुमारे 1 लाख 35 हजार मोठी जनावरे आणि 37 हजार शेळी-मेंढ्या, असे मिळून जवळपास 1 लाख 72 हजार पशुधन आहे.

भविष्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी 75 हजार किलो मका बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे 50 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना मका बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे.

पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत जलसंधारण, पीक नुकसानीचे पंचनामे आणि पशुधनासाठी चारा व्यवस्थापन या तीनही आघाड्यांवर प्रशासनाने उपाययोजनांना वेग दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.