सिंधुदुर्गात कायम शिक्षक भरतीऐवजी ‘उसनवार विषय सहायक’ योजना; शासनाच्या निर्णयावर आश्चर्य, शिक्षकांची हजारो पदे रिक्त
15 नोव्हेंबरपर्यंत अर्जाची संधी
परिपत्रकानुसार, विषय सहायकांची पदे उसनवारी तत्त्वावर भरण्यासाठी www.maa.ac.in या संकेतस्थळावर ‘विषय सहायक निवड प्रक्रिया’ हा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा टॅब 28 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 15 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुला राहणार आहे.
या प्रक्रियेत शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच अध्यापक विद्यालयांमधील नियमित शिक्षकांना अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रियेनंतर संबंधित शिक्षकांना दुसऱ्या शाळेत उसनवारी तत्त्वावर विषय सहायक म्हणून नियुक्त केले जाणार आहे.
सिंधुदुर्गात गणित, विज्ञान शिक्षकांची कमतरता
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणित आणि विज्ञान विषयांच्या शिक्षकांची कमतरता गंभीर स्वरूपाची असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत एका शाळेतील शिक्षक दुसऱ्या शाळेत पाठविल्यास मूळ शाळेतील अध्यापन व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एका शाळेतील शिक्षक दुसऱ्या शाळेत पाठवून शिक्षकांची कमतरता भरून काढणे म्हणजे एका ठिकाणची समस्या दुसऱ्या ठिकाणी निर्माण करण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम कधी?
बी.एड., एम.ए. यांसारख्या पदव्या प्राप्त केलेले अनेक सुशिक्षित तरुण नियमित शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, कायमस्वरूपी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी उसनवारी तत्त्वावर विषय सहायक नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याने शासनाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
शिक्षकांची रिक्त पदे भरून काढण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी नियमित भरती प्रक्रिया वेगाने राबविण्याची मागणी होत आहे. उसनवारीच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था किती काळ चालविणार आणि बेरोजगार शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरीची संधी कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षक भरतीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून, सिंधुदुर्गातील शिक्षण व्यवस्थेवर त्याचे काय परिणाम होणार, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
