For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गात शिवसेना उबाठाकडून 100 वनराई बंधाऱ्यांचा संकल्प; पावशी-मुळदेत शुभारंभ

06:49 PM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिंधुदुर्गात शिवसेना उबाठाकडून 100 वनराई बंधाऱ्यांचा संकल्प  पावशी मुळदेत शुभारंभ
Advertisement

कुडाळ | वार्ताहर : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठे निर्माण करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुढाकार घेतला आहे. पक्षाच्या वतीने शिवसैनिकांच्या श्रमदानातून जिल्ह्यात 100 वनराई कच्चे बंधारे उभारण्यात येणार असून, या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी पावशी आणि मुळदे येथे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

Advertisement

यावेळी वैभव नाईक यांनी सांगितले की, यंदा पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याने जिल्ह्यात पाण्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जलसाठे निर्माण करण्यासाठी वनराई बंधारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या अभियानांतर्गत पावशी आणि मुळदे येथे दोन बंधाऱ्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Advertisement

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे नाईक यांनी नमूद केले. शिवसेना उबाठा पक्षाच्या माध्यमातून भविष्यातही जलसंधारणासह विविध सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

पावशी येथील शुभारंभ कार्यक्रमाला शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, बाळा पावसकर, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती सदस्य तथा गटनेते योगेश धुरी, अमित राणे, उपविभागप्रमुख सचिन ठाकूर, पावशी उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, माणगाव उपसरपंच बापू बागवे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मुळदे येथे उपसरपंच प्रवीण पालव, भिवा पालव, माजी सरपंच संजय पालव, ग्रामपंचायत सदस्य अपूर्वा पालव, शशिकांत पालव यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. वनराई बंधाऱ्यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर पाणीसाठा वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.