सिंधुदुर्ग पोलीस दलातील सफाई कामगारांच्या वारसांना लवकरच न्याय; पालकमंत्री नितेश राणेंचे आश्वासन
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सफाई कामगारांच्या पात्र वारसांना वारसा हक्काने शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी प्रलंबित प्रकरणावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
लाड पागे समितीच्या शिफारशी, न्यायालयीन निर्देश आणि शासनाच्या संबंधित निर्णयानुसार सफाई कामगारांच्या पात्र वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवरील काही पात्र वारसांना अद्याप नियुक्ती मिळालेली नसल्याचे शिष्टमंडळाने पालकमंत्री राणे यांच्या निदर्शनास आणून दिले.
या प्रलंबित प्रकरणात बांदा येथील अंजली अभिनय बांदेकर, सावंतवाडी येथील काशिनाथ रमेश नाईक आणि कुडाळ येथील भाग्यश्री रामचंद्र काळप या तीन वारसांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून या तिघांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन नितेश राणे यांनी दिल्याचे भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी खासदार नारायण राणे यांचीही मुंबईतील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.
या दोन्ही भेटींवेळी सुरेंद्र भोसले आणि रोहित सुर्वे उपस्थित होते. सफाई कामगारांच्या वारसांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आश्वासनामुळे संबंधित कुटुंबांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.