पावसाने दडी मारल्याने सिंधुदुर्गातील भातशेती संकटात; जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
सावंतवाडी : संतोष सावंत : कोकणातील प्रमुख खरीप पीक असलेल्या भातशेतीवर यंदा पावसाच्या खंडामुळे मोठे संकट ओढवले आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भातशेती कोमेजू लागली आहे. दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
जून-जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली होती. मात्र सप्टेंबरमध्ये पावसाचा अभाव कायम राहिल्याने तयार होत असलेल्या कणसांना पुरेसे पाणी मिळत नाही. अनेक ठिकाणी शेतातील वाफ्यांना तडे जाऊ लागले असून पीक सुकण्याची भीती व्यक्त होत आहे. काही शेतकरी पिके वाचवण्यासाठी बादल्या, मोटार आणि इंजिनच्या साहाय्याने पाणी देत आहेत.
नदी-नाले आटले; पाणीसाठ्यातही घट
पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक नदी-नाले, ओहोळ आणि जलस्रोतांच्या पाणीपातळीत लक्षणीय घट झाली आहे. सावंतवाडीतील तेरेखोल आणि भंगसाळ नदीपात्रातही पाणी कमी झाले आहे. तेरेखोल नदीच्या पाणीपातळीत सुमारे 30 ते 40 टक्क्यांनी घट झाल्याने नदीपात्रातील दगड उघडे पडू लागले आहेत. त्याचा परिणाम विहिरींच्या पाणीपातळीवरही झाला आहे.
जिल्ह्यातील 38 लघु पाटबंधारे प्रकल्प ऑगस्टमध्ये पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र त्यानंतर पाऊस न झाल्याने त्यातील पाणीसाठा सुमारे 83.83 टक्क्यांवर आला आहे. वाढत्या उन्हामुळे भातासोबतच नारळ, सुपारी आणि अन्य फळबागांवरही परिणाम होत आहे. पशुधनासाठी आवश्यक असलेल्या चारा-गवताच्या उपलब्धतेबाबतही चिंता निर्माण झाली आहे.
गणेश विसर्जनासाठीही पाण्याची अडचण
गणेशोत्सवाच्या काळात सिंधुदुर्गातील नद्या, नाले आणि ओहोळ पाण्याने भरलेले असतात. मात्र यंदा अनेक गावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही. काही ठिकाणी अल्प पाणीसाठ्यात किंवा डबक्यांमध्ये विसर्जन करावे लागले. काही गावांमध्ये नदीपात्रात खोलगट जागा तयार करून विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली.
उत्पादनात मोठ्या घटीची भीती
सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ आणि कणकवली हे भात उत्पादनासाठी महत्त्वाचे तालुके आहेत. कुडाळ तालुक्यातील माणगाव तसेच सावंतवाडीच्या सह्याद्री पट्ट्यातील भातशेतीला पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. पारंपरिक व सुधारित वाणांची लागवड चांगली झाली असली, तरी दाणे भरण्याच्या काळात पाणी मिळत नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
याशिवाय हत्ती, माकड, गवे आणि अन्य वन्यप्राण्यांकडून भातशेती व फळबागांचे होणारे नुकसानही शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत आहे. त्यामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
कृषी विभागाला सूचना
सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी तालुक्यात पावसाअभावी भातपीक धोक्यात आल्याची माहिती दिली. परिस्थितीची दखल घेऊन कृषी विभागाला आवश्यक सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला असून सप्टेंबरमध्येही अपेक्षित पाऊस झालेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.
दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी
पावसाचा खंड आणखी वाढला आणि परतीचा पाऊस लांबला, तर जिल्ह्यातील मोठ्या क्षेत्रावरील भातपीक वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे सर्वेक्षण करावे आणि सिंधुदुर्गला दुष्काळी परिस्थितीचा सामना करणारा जिल्हा म्हणून आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई आणि तातडीची मदत मिळावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.