For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गातील भातशेतीवर दुष्काळाचे संकट; शेतकऱ्यांचे हाल पाहून पालकमंत्री नितेश राणे गहिवरले

12:47 PM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिंधुदुर्गातील भातशेतीवर दुष्काळाचे संकट  शेतकऱ्यांचे हाल पाहून पालकमंत्री नितेश राणे गहिवरले
Advertisement

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने भातशेतीवर गंभीर परिणाम झाला असून अनेक भागांत पिके करपली आहेत. काही ठिकाणी भातपिकाची वाढ खुंटली असून वाढलेल्या पिकाला लोंब्या आल्या असल्या तरी दाणे न भरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे शेतांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

Advertisement

यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. पावसाने ऐन गरजेच्या वेळी दगा दिल्याने भातपिकाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही ठिकाणी पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली, तर काही ठिकाणी लोंब्या आल्या असल्या तरी त्यात दाणे भरले नसल्याची माहिती त्यांनी दिली.

शेतकऱ्यांची अवस्था आणि करपलेली भातशेती पाहून नितेश राणे भावूक झाले. “परिस्थिती गंभीर आहे; मात्र शेतकऱ्यांनी काळजी करू नये. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

Advertisement

नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

या पाहणीवेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बासुरी, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे आणि उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

बाधित शेतकऱ्यांच्या शेतांवर प्रत्यक्ष जाऊन नुकसानीचे अचूक पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

‘ट्रिगर 1’ लागू

नितेश राणे यांनी सांगितले की, कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यात ‘ट्रिगर 1’ लागू झाला असून शासनाच्या नियमानुसार दुष्काळग्रस्तांना मिळणारी मदत तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. संकटाच्या काळात सिंधुदुर्गातील कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, केवळ शेतीचे नुकसानच नव्हे तर पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी जलसंधारण आणि पाण्याच्या नियोजनावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

“कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो; मात्र पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात वाहून जाते. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच जलसंधारण आणि पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे,” असे आवाहन राणे यांनी केले.

या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य गुरुनाथ पेडणेकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.