अवैध मासेमारीला सिंधुदुर्गात दणका! 248 नौकांवर 2.25 कोटींचा दंड; मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई तीव्र
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी विभागाने मोहीम अधिक तीव्र केली आहे. सागरी हद्दीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर लक्ष ठेवण्यासाठी गस्ती नौका आणि ड्रोन देखरेख यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी कठोर पावले
सिंधुदुर्ग जिल्ह्याला समृद्ध सागरी जैवविविधतेचा वारसा लाभला असून, हजारो मच्छीमार कुटुंबांची उपजीविका मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, अवैध आणि नियमबाह्य मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होण्याबरोबरच सागरी मत्स्यसंपदेच्या संवर्धनापुढेही आव्हाने निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर पारंपरिक मच्छीमारांच्या हितांचे संरक्षण करणे आणि सागरी संसाधनांचे जतन करणे यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर मत्स्यव्यवसाय विभागाने भर दिला आहे.
ड्रोनद्वारे सागरी क्षेत्रावर देखरेख
अवैध मासेमारी रोखण्यासाठी सागरी हद्दीत नियमित गस्त घालण्यात येत आहे. संशयास्पद नौकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विभागाने दोन ड्रोन उपलब्ध करून घेतले आहेत. या यंत्रणेमुळे सागरी क्षेत्रातील हालचालींवर देखरेख ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्या नौकांची ओळख पटविणे अधिक सुलभ होण्यास मदत होत आहे.
मासेमारी नौकांची तपासणी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी आवश्यक यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे.
नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार
सागरी मासेमारीचे नियम मोडणाऱ्या नौकांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे. सागरी मत्स्यसंपदेचे संवर्धन, पारंपरिक मच्छीमारांच्या हक्कांचे संरक्षण आणि शाश्वत मासेमारी व्यवस्थापनासाठी सागरी मासेमारी नियमन अधिनियमातील तरतुदींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांच्याकडून करण्यात आले आहे.
