For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाची तूट, दुष्काळाची चाहूल; सिंधुदुर्गात जलसाठ्यांच्या नियोजनाची गरज : डॉ. जयेंद्र परुळेकर

03:32 PM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
पावसाची तूट  दुष्काळाची चाहूल  सिंधुदुर्गात जलसाठ्यांच्या नियोजनाची गरज   डॉ  जयेंद्र परुळेकर
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांमध्ये दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आगामी काळातील पाणीटंचाईचा विचार करून आतापासूनच नियोजन करावे, अशी मागणी शिवसेना ओरिजनलचे जिल्हा प्रवक्ता डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या आठही तालुक्यांचा दुष्काळी परिस्थितीत समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

डॉ. परुळेकर यांच्या मते, यंदा पावसातील तूट आणि दीर्घ कोरड्या कालावधीचा परिणाम सिंधुदुर्गातील शेती आणि जलस्रोतांवर जाणवत आहे. पावसाळा संपण्यापूर्वीच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने जलस्रोतांचे संवर्धन आणि पाणीसाठ्यांचे नियोजन करण्याची गरज आहे.

वृक्षतोडीवर नियंत्रणाची मागणी

सिंधुदुर्गच्या सह्याद्री परिसरातील बेसुमार वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता तसेच भूजलसाठ्यांवर परिणाम होत असल्याचा दावा डॉ. परुळेकर यांनी केला. त्यामुळे सह्याद्री परिसरातील वृक्षतोडीवर तातडीने नियंत्रण आणून पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement

भातशेतीलाही पावसाच्या खंडाचा फटका

पावसातील अनियमितता आणि खंडाचा परिणाम भातशेतीवर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांसमोर आर्थिक व पाणीटंचाईचे आव्हान निर्माण होऊ शकते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे, जलस्रोतांची स्थिती आणि पाण्याची उपलब्धता यांचा आढावा घेऊन प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्य सरकारने 2026 मध्ये 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करून ‘Trigger-1’ लागू केला आहे. त्यामध्ये सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर जलसंधारण, पाणीपुरवठा आणि शेतीसंबंधी उपाययोजनांना गती देण्याची आवश्यकता आहे.

“आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी प्रशासनाने आतापासूनच पाणीसाठे, जलस्रोत आणि टँकर व्यवस्थेचे नियोजन करावे,” अशी मागणी डॉ. परुळेकर यांनी केली.

Advertisement

.