सिंधुदुर्ग ‘ट्रिगर-1’मध्ये; दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य ओळखा; शेतकऱ्यांना सरसकट मदत करा : पालकमंत्री नितेश राणेंचे प्रशासनाला निर्देश
सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करून मात करावी. बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यात 10 हजार कच्चे बंधारे उभारण्याचे निर्देशही देण्यात आले.
यंदा जिल्ह्यात पावसामध्ये मोठा खंड पडला असून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विविध पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ‘ट्रिगर-1’मध्ये आला आहे. या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये अनावश्यक भीती निर्माण न करता प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे परिस्थितीचा सामना करावा, असे राणे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दिलासा देतानाच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. तसेच ‘ट्रिगर-2’च्या अनुषंगाने आवश्यक अहवाल वस्तुनिष्ठ असावा आणि जिल्ह्यातील परिस्थितीचे योग्य चित्र त्यातून स्पष्ट झाले पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले.
लोकप्रतिनिधींनीही दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना आणि सूचना बैठकीत मांडल्या.