सिंधुदुर्गात कमी पावसाचा खरीपाला फटका; भातशेती संकटात, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील भात पिकावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, भात उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण तालुक्यातील पोईप येथे भेट देऊन भात पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, झालेल्या नुकसानीची माहिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर, पोईपचे सरपंच तसेच महसूल आणि कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करावी, नुकसानीची माहिती संकलित करून आवश्यक अहवाल तातडीने सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिल्या आहेत.
कमी पावसामुळे भात शेती अडचणीत आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.