For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्या सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची सावंतवाडीत बैठक

11:23 AM Apr 16, 2025 IST | अनुजा कुडतरकर
उद्या सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची सावंतवाडीत बैठक
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

Advertisement

पावसाळा तोंडावर येऊनही सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्याबाबत वीज वितरणकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे निद्रिस्त असलेल्या महावितरणला जाग आणण्यासाठी आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील वीज समस्या मार्गी लावण्यासाठी सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यातील वीज ग्राहकांची महत्वाची बैठक गुरुवार १७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता तर जिल्हा विज ग्राहक संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक सकाळी ११ वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या पत्रकार कक्षाच्या शेजारील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. मळगाव येथील संयुक्त बैठकीत पंचक्रोशीतील विज समस्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन देऊनही समस्या जैसे थे असल्याने मळगाव परिसरातील वीज ग्राहक नाराज आहेत. तसेच आंबोलीसह सह्याद्री पट्ट्यातील सरमळे, दाभिल, मडूरासह तालुक्यात अनेक गावांमध्ये विजेचाखेळखंडोबा सुरूच आहे. जीर्ण ट्रान्सफॉर्मरचे स्फोट होण्याच्या दोन घटना तालुक्यात घडल्या असून वीज ग्राहकांची विद्युत उपकरणे खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच स्पार्किंग होऊन शेतात आग लागून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ओटवणे येथे इन्सुली येथून तिलारी कालवामार्गे विज लाईन मंजूर असूनही कामाला विलंब होत आहे. सावंतवाडी शहरातही विजेचा लपंडाव सुरूच आहे. त्यामुळे या अनेक विज समस्याबाबत महावितरणला जागे करण्यासाठी ग्राहकांनी आपल्या लेखी तक्रारी सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे देऊन त्याची एक प्रत वीज ग्राहक संघटनेकडे द्यावी. त्यानंतर संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करून समस्या सोडविण्यात येणार आहेत. पावसाळ्यापूर्वी विजेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हा वीज ग्राहक संघटना प्रयत्नशील असून लवकरच कुडाळ-मालवण मतदारसंघ, कणकवली मतदारसंघातही वीज ग्राहकांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकीला तालुक्यातील वीज ग्राहकांसह संघटनेच्या सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.