For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सिंधुदुर्ग काँग्रेसचे आंदोलन; राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यावरील लाठीचार्जचा निषेध; मालवणात ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिमेचे दहन

06:08 PM Oct 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सिंधुदुर्ग काँग्रेसचे आंदोलन  राहुल गांधी  प्रियंका गांधी यांच्यावरील लाठीचार्जचा निषेध  मालवणात ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिमेचे दहन
Advertisement

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या ‘लोकशाही वाचवा सप्ताहा’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने गुरुवारी मालवण शहरातील भरड नाका परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. तसेच दिल्ली येथे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यावर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला.

Advertisement

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार 28 सप्टेंबरपासून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘लोकशाही वाचवा’ सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात काँग्रेसकडून भूमिका मांडण्यात येत आहे.

निवडणूक प्रक्रियेवर काँग्रेसचे प्रश्न

मालवणातील आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर टीका केली. निवडणूक प्रक्रियेत कथित त्रुटी आणि अनियमितता असल्याने नागरिकांच्या लोकशाही व्यवस्थेवरील विश्वासाला धक्का पोहोचत असल्याचा दावा आंदोलकांनी केला.

Advertisement

जनतेच्या मतांचा आदर आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राहणे आवश्यक आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे मतदारांच्या भावनांना ठेच पोहोचत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.

‘मतचोरी’च्या आरोपावरून घोषणाबाजी

निवडणूक प्रक्रियेत झालेल्या कथित चुकांमुळे मतांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे मदत मिळत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. या कथित गैरप्रकारांविरोधात काँग्रेस देशभर ‘लोकशाही वाचवा’ सत्याग्रह करीत असून, सिंधुदुर्गातील आंदोलन त्याचाच एक भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिमेचे दहन करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला.

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यावरील लाठीचार्जचा निषेध

दिल्ली येथे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यावर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचाही यावेळी निषेध करण्यात आला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांशी सन्मानपूर्वक वागण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांचे जतन यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलनादरम्यान व्यक्त करण्यात आली.

या आंदोलनाला जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, सरचिटणीस देवानंद लुडबे, ओबीसी प्रदेश सचिव महेश अंधारी, सेवादलचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, मालवण तालुका काँग्रेस अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष सरदार ताजर, महेंद्र मांजरेकर, पराग माणगावकर, तळवडेकर, बाबा मेंडीस यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.