निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सिंधुदुर्ग काँग्रेसचे 28 सप्टेंबरला निषेध आंदोलन
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार, 28 सप्टेंबर रोजी ओरोस येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालय गेटसमोर हे आंदोलन होणार असून, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीशी संबंधित विविध मुद्द्यांवर काँग्रेसने आक्षेप नोंदवले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निर्देशानुसार देशभरातील जिल्हा पातळीवर निषेध आंदोलनांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे आंदोलन होणार आहे. देशातील इतर राज्यांमध्येही काँग्रेसकडून 28 सप्टेंबरला जिल्हा पातळीवरील आंदोलनांचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहेत.
या आंदोलनाला जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, प्रांतिक सदस्य, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल, ओबीसी, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती, INTUC यांसह विविध सेल व विभागांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तालुका काँग्रेस अध्यक्ष व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण प्रक्रियेंतर्गत दावे व हरकतींवरील सुनावणी सुरू आहे. संबंधित मतदारांना सुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.