चिवला किनाऱ्याची स्वच्छता; मालवण सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा पुढाकार
मालवण : आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे वनशक्ती, इंडिया यांच्या सहकार्याने चिवला समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात महाविद्यालयातील 33 NSS स्वयंसेवक आणि 6 प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. कैलास राबते आणि NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी समुद्रकिनारा व परिसरातील प्लास्टिक तसेच इतर घनकचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला.
समुद्रकिनारे स्वच्छ ठेवणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि सागरी व किनारी परिसंस्थेचे संवर्धन याबाबत जनजागृती करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता. सामूहिक सहभागातून स्वयंसेवकांनी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी डॉ. हंबीरराव चौगले यांनी विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरण आणि त्याच्या योग्य व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगितले. डॉ. संकेत बेळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तसेच किनारी परिसराच्या संरक्षणासाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली.
अभियानाच्या यशस्वितेसाठी डॉ. सुमेधा नाईक, डॉ. संकेत बेळेकर, प्रा. योगिता सावंत, प्रा. अनघा टिकले, सोहम भोगले, मयुरेश कदम, क्रांती पालव आणि वैभवी गावडे यांनी परिश्रम घेतले.