For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाअभावी भातशेती संकटात; जिल्हाधिकाऱ्यांकडून वेंगुर्ल्यात बांधावर जाऊन पाहणी; म्हापण, परुळे, रावदास-कुशेवाडा गावांना भेट ; शेतकऱ्यांनी मांडल्या अडचणी

04:52 PM Sep 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
पावसाअभावी भातशेती संकटात  जिल्हाधिकाऱ्यांकडून वेंगुर्ल्यात बांधावर जाऊन पाहणी  म्हापण  परुळे  रावदास कुशेवाडा गावांना भेट   शेतकऱ्यांनी मांडल्या अडचणी
Advertisement

परुळे | त. भा. प्रतिनिधी : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे भातासह अन्य पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यातच विहिरींच्या पाणीपातळीतही घट होत असल्याने शेतकऱ्यांसमोर शेतीच्या सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी वाया जाण्याची भीती व्यक्त होत असतानाच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी वेंगुर्ले तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन प्रत्यक्ष शेतांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

Advertisement

जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी धोंडमिसे यांनी म्हापण, परुळे आणि रावदास-कुशेवाडा परिसरातील शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतात जाऊन पिकांची सद्यस्थिती, वाढ, उपलब्ध पाण्याची व्यवस्था तसेच पाण्याअभावी झालेल्या संभाव्य नुकसानीची माहिती घेतली.

परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीचीही त्यांनी पाहणी केली. शेतीसाठी उपलब्ध असलेली जलस्रोतांची स्थिती आणि त्यावर अवलंबून असलेल्या सिंचन व्यवस्थेची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.

Advertisement

‘मेहनत वाया जाण्याची वेळ आली’

पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत सध्याच्या शेती परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, केलेली मेहनत डोळ्यांसमोर वाया जाताना पाहावी लागत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

काही ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत असून, त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाअभावी विहिरींच्या पाणीपातळीत सातत्याने घट होत असल्याने शेतीच्या सिंचनाबरोबरच भविष्यात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भागेश्री नाईकनवरे, गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सुदेश राणे, तालुका अभियंता प्रफुल्ल कुमार शिंदे, कृषी सहाय्यक सूरज परब, निवती पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तसेच जि. प. सदस्य यज्ञा साळगांवकर, पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, उपसरपंच महादेव सापळे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती प्रसाद पाटकर, ग्रामविकास अधिकारी आनंद परुळेकर, म्हापण ग्रामपंचायत सरपंच आकांक्षा चव्हाण, उपसरपंच सुरेश ठाकूर, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.