निवडणूक खर्चाचा हिशोब न दिल्याने सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवलीतील 23 उमेदवारांवर कारवाई; तीन वर्षांसाठी अपात्र; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा आदेश
सावंतवाडी (प्रतिनिधी) : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये निवडणूक खर्चाचा हिशोब विहित मुदतीत सादर न करणाऱ्या सावंतवाडी, वेंगुर्ला आणि कणकवलीतील 23 उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संबंधित उमेदवारांना आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले आहे.
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक होते. मात्र, संबंधित उमेदवारांनी निर्धारित मुदतीत खर्चाचा हिशोब सादर केला नाही. तसेच त्यांच्याकडून समाधानकारक खुलासाही प्राप्त झाला नसल्याने ही कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 16 (1) पोटकलम (1ड) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे.
अपात्र ठरलेल्या 23 उमेदवारांमध्ये सावंतवाडी नगरपरिषदेतील 17, वेंगुर्ला नगरपरिषदेतील 5 आणि कणकवली नगरपंचायतीतील एका उमेदवाराचा समावेश आहे. सावंतवाडीतील अपात्र उमेदवारांमध्ये विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार आहेत.
सावंतवाडीतील चंद्रशेखर सुभेदार, गीता सुकी, उमेश कोरगावकर, आगोस्तीन फर्नांडीस, श्रुतिका ढवळी, श्याम वाडकर, अॅड. रितू परब, स्नेहल मसूरकर, फरीदा बागवान, प्रदीप कांबळे, अॅड. समी ख्वाजा, अरुण भिसे, मीरा उर्फ लतिका सिंग, शेख मेहरार इम्रान, शेख निशातअंजुम आणि नियाज शेख यांचा समावेश आहे. याशिवाय संदीप वेंगुर्लेकर, दत्ताराम केळजी, नेहा गावडे, दत्ताराम नार्वेकर, पुजा घाडी, अस्मिता म्हापणकर आणि माधवी मुरकर यांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे.
या कारवाईमुळे संबंधित 23 उमेदवारांना पुढील तीन वर्षे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवता येणार नाही.
