सिंधुदुर्गच्या महिला उद्योजिकांचा राज्यस्तरीय गौरव; नाशिकमध्ये पुरस्कार वितरण
कुडाळ / वार्ताहर : विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत उद्योग आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 14 नवउद्योजिकांचा ‘कर्तृत्ववान स्त्री शक्ती – उद्योगिनी महाराष्ट्राची’ राज्यस्तरीय पुरस्काराने नाशिक येथे गौरव करण्यात आला.
सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त संजीवन उद्योग समूहाच्या वतीने नाशिक येथील रेशीमगाठी लॉन्स येथे पुरस्कार वितरण सोहळा आणि आरोग्य विभागांतर्गत फिरत्या दवाखान्याचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 80 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना स्वामी कंठानंद यांनी महिलांनी केवळ रोजगाराच्या शोधात न राहता रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योजिका बनावे, असे आवाहन केले. महिलांमध्ये मोठी ऊर्जा असून तिचा योग्य वापर करून सामाजिक कार्यापासून सेवाभाव आणि कर्मापासून कर्मयोगाकडे वाटचाल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुनीता मोडक यांनी महिलांनी इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या व्यवसायातून रोजगार निर्माण करावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून उद्योजकतेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गातील पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये रेश्मा जळवी, उन्मेषा दाभोलकर, स्वाती पेडणेकर, मृणाल सावंत, कीर्ती पाटील, पूजा कुडव, सानिका सावंत, श्रुती केसरकर, स्वप्नाली जळवी, दर्शना धुरी, दर्शना मार्गी, प्रियांका सुकाळे, वृंदा राऊत आणि रोहिणी घाडी यांचा समावेश आहे.
कुडाळ येथे सुरू झालेल्या शिवणकाम रोजगार उपक्रमाचा उल्लेख करत उन्मेषा दाभोलकर यांनी लघुउद्योगांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी आश्रय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक माधव गोरे तसेच सतीश पाथरुड यांचाही सन्मान करण्यात आला.