सिंधूची उर्वरित हंगामातून माघार
दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने युरोपियन स्पर्धेपूर्वी झालेल्या पायाच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी 2025 मधील उर्वरित सर्व बीडब्ल्यूएफ टूर स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हैदराबादची ही 30 वर्षीय शटलर म्हणाली की, तिची सपोर्ट टीम आणि वैद्यकीय तज्ञांशी सविस्तर सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यात प्रसिद्ध क्रीडा ऑर्थोपेडिस्ट डॉ. दिनशॉ पारडीवाला यांचा समावेश आहे. ‘माझ्या टीमशी सल्लामसलत केल्यानंतर आणि डॉ. पारडीवाला यांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर आम्हाला वाटले की, 2025 मधील उर्वरित सर्व बीडब्ल्यूएफ टूर स्पर्धांमधून माघार घेणे हेच माझ्यासाठी सर्वोत्तम आहे’, असे सिंधूने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे.
‘युरोपियन स्पर्धेत खेळण्यापूर्वी मला झालेली पायाची दुखापत पूर्णपणे बरी झालेली नाही आणि ती स्वीकारणे कधीही सोपे नसले, तरी अशा दुखापती प्रत्येक खेळाडूच्या प्रवासाचा अविभाज्य भाग असतात. त्या तुमच्या लवचिकतेची आणि संयमाची परीक्षा घेतात, परंतु त्या मजबूत पुनरागमनासाठी प्रेरित देखील करतात, असे तिने सांगितले. 2019 ची विश्वविजेती सिंधू म्हणाली की, तिची दुखापतीतून सावरण्याची प्रक्रिया आणि सराव आधीच डॉ. वेन लोम्बार्ड यांच्या देखरेखीखाली सुरू असून निशा रावत, चेतना आणि प्रशिक्षक इरवन्स्या आदि प्रतामा यांचे साहाय्य तिला लाभत आहे.
मी अशा टीमने वेढलेली आहे, जी मला दररोज ताकद देतो. माझ्यावरील त्यांचा विश्वास मला बळकटी देतो, असे सिंधूने सांगितले आहे. ही कॉमनवेल्थ खेळांतील विजेती मागील काही काळापासून दुखापती आणि फॉर्मशी झुंजत आहे. पॅरिस खेळांमधून लवकर बाहेर पडल्यानंतर हे वर्ष देखील सिंधूसाठी फारसे अनुकूल राहिलेले नाही. अनेक वेळा तिला पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत बाहेर पडावे लागले आहे. इंडिया ओपन सुपर 750, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि चायना मास्टर्स सुपर 750 मध्ये तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि ही तिची या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी राहिलेली आहे. गेल्या वर्षी मलेशिया मास्टर्समध्ये ती अव्वल श्रेणीचे विजेतेपद जिंकण्याच्या जवळ पोहोचली होती आणि शेवटी उपविजेती ठरली होती. तिने गेल्या डिसेंबरमध्ये सय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर 300 स्पर्धेचा किताब जिंकला होता.