सिंधू, सेन, अनमोल खर्ब उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था, बर्लिन (जर्मनी)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या 2026 च्या हायलो खुल्या सुपर-500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधू, अनमोल खर्ब यांनी महिला एकेरीत तर लक्ष्य सेनने पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. आता या स्पर्धेत सिंधू आणि खर्ब यांच्यात उपांत्य फेरीत गाठ पडणार आहे.
शनिवारी खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या आतापर्यंत दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या अनुभवी पीव्ही सिंधूने डेन्मार्कच्या अॅमेली शूल्झचा केवळ 28 मिनिटात 21-12, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले. आता पीव्ही सिंधूचा उपांत्य फेरीचा सामना भारताच्या नवोदीत अनमोल खर्बशी होणार आहे.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील अन्य एका सामन्यात अनमोल खर्बने आपल्या देशाच्या उन्नती हुडाचा 21-17, 18-21, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. हा अटीतटीचा सामना 68 मिनिटे चालला होता. अनमोलने पहिला गेम 21-17 असा जिंकल्यानंतर उन्नतीने दुसऱ्या गेममध्ये डावपेचात बदल करत अनमोलला वारंवार चुका घडविण्यास भाग पाडले. हा दुसरा गेम उन्नतीने 21-18 असा जिंकून बरोबरी साधली. तिसरा गेमही शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीचा झाला. पण अनमोलने आपल्या उत्कृष्ट स्मॅश फटकाच्या जोरावर उन्नतीचे आव्हान संपुष्टात आणले. 19 वर्षीय अनमोलने या सामन्यामध्ये अचूक सर्व्हिसवर अधिक भर दिला होता.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने फिनलँडच्या कॅली कोलजोनेनचा 14-21, 21-17, 21-13 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना 65 मिनिटे चालला होता. कोलजोनेनने पहिला गेम 21-14 असा जिंकल्यानंतर लक्ष्य सेनने पुढील दोन गेम्समध्ये स्मॅश फटक्यांच्या जोरावर कोलजोनेनला वारंवार नेटजवळ खेचले. त्यामुळे त्याच्याकडून परतीचे फटके मारताना चुका झाल्याने लक्ष्य सेनने हि लढत जिंकली. गेल्या मार्च नंतर लक्ष्य सेनने 2026 च्या बॅडमिंटन हंगामात दुसऱ्यांदा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. मार्चमध्ये झालेल्या अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने उपांत्य फेरी गाठली होती.
