For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधू, सात्विक-चिराग यांची विजयी सलामी

06:08 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिंधू  सात्विक चिराग यांची विजयी सलामी
Advertisement

मलेशिया ओपन बॅडमिंटन : ध्रुव-तनिशा, त्रीशा-गायत्री, पांडा भगिनी स्पर्धेबाहेर

Advertisement

वृत्तसंस्था/ कौलालंपूर

दुखापतीच्या दीर्घ विश्रांतीनंतर परतलेल्या पीव्ही सिंधूने नव्या मोसमात विजयी पुनरागमन करताना मलेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. त्याचप्रमाणे पुरुष दुहेरीची जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनीही विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली.

Advertisement

30 वर्षीय सिंधू ही माजी वर्ल्ड चॅम्पियन असून गेल्या ऑक्टोबरमध्ये तिने बीएफडब्ल्यू वर्ल्ड टूरवरील सर्व स्पर्धांतून माघारीचा निर्णय घेतला होता. पायाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी तिने हा निर्णय घेतला होता. येथे तिने चिनी तैपेईच्या सुंग शुओ युनवर 21-14, 22-20 अशी 51 मिनिटांच्या खेळात मात केली. 18 व्या मानांकित सिंधूला या सामन्यावेळी कोणताही त्रास झाला नाही. सुंगवर तिने दुसऱ्यांदा मात केली आहे. तिची पुढील लढत जागतिक 9 व्या मानांकित जपानच्या टोमोका मियाझाकीशी होईल. मियाझाकी ही 2022 ची ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आहे. तिने दक्षिण कोरियाच्या दहाव्या मानांकित सिम यु जिनवर मात केली. मियाझाकी 21-19, 1-2 अशा स्थितीत असताना जिनने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली. मियाझाकीविरुद्ध सिंधूचे 1-1 असे रेकॉर्ड आहे. 2025 मध्ये चायना मास्टर्स स्पर्धेत सिंधूने तिला हरविले होते.

पुरुष दुहेरीतील माजी अग्रमानांकित जोडी सात्विक-चिराग यांनी चिनी तैपेईच्या यांग पो सुआन व ली झे-हुइ यांच्यावर 21-13, 21-15 अशी 35 मिनिटांत मात करीत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. सात्विक-चिरागचा हा त्यांच्यावरील सातवा विजय आहे. त्यांची पुढील लढत मलेशियाच्या जुनैदी अरिफ व रॉय किंग यॅप यांच्याशी होईल.

मिश्र, महिला दुहेरीत भारताला अपयश

मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला व तनिशा क्रॅस्टो या जागतिक 17 व्या मानांकित जोडीला मात्र पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. अमेरिकेच्या प्रेसली स्मिथ व जेनी गाय यांच्याकडून त्यांना 15-21, 21-18, 15-21 असा पराभव स्वीकारावा लागला. 56 मिनिटे ही लढत रंगली होती. त्याचप्रमाणे महिला दुहेरीत त्रीशा जॉली व गायत्री गोपीचंद यांनाही पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.   गेल्या डिसेंबरमध्ये सय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर 300 स्पर्धेत जेतेपद मिळविलेल्या त्रीशा-गायत्री यांनी झुंजार खेळ केला, पण त्यांना इंडोनेशियाच्या फेब्रिआना द्विपुजी कुसुमा व मेलीसा ट्रायन पुस्पितासरी यांच्याकडून 9-21, 23-21, 19-21 असा पराभूत व्हावे लागले. 66 मिनिटे ही झुंज रंगली होती. महिला दुहेरीतील आणखी जोडी पांडा भगिनी रुतुपर्णा व श्वेतपर्णा यांनाही स्पर्धेबाहेर पडावे लागले. मलेशियाच्या दुसऱ्या मानांकित पीयर्ली टॅन व थिनाह मुरलीधरन यांनी त्यांना 21-11, 21-9 असे एकतर्फी हरविले.

Advertisement
Tags :

.