सिंधू, सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत दाखल
मलेशिया ओपन बॅडमिंटन : लक्ष्य सेन, आयुष शेट्टीचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/कौलालंपूर
भारताच्या पीव्ही सिंधूने आणि सात्विकसाईराज-चिराग शेट्टी यांनी मलेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मात्र लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात आले. माजी वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या पीव्ही सिंधूने जपानच्या तोमोको मियाझाकीचे आव्हान 21-8, 21-13 असे केवळ 33 मिनिटांच्या खेळात संपुष्टात आणत आगेकूच केली. तिची उपांत्यपूर्व लढत जपानच्याच अकाने यामागुचीशी होईल. यामागुचीने तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. तिने चीनच्या गाओ फँग जी हिचा 21-11, 4-21, 21-17 असा पराभव केला.
पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक-चिराग यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठताना मलेशियाच्या जागतिक 17 व्या मानांकित जुनैदी अरिफ-रॉय किंग यॅप यांच्यावर 21-18, 21-12 अशी मात केली. भारतीय जोडीने हाँगकाँग ओपन व चायना मास्टर्स या स्पर्धांची अंतिम फेरी गाठली होती. त्यांची पुढील लढत चिनी तैपेईच्या चेन ^ज रे-लिय यु चीह आणि इंडोनेशियाच्या फजर अल्फियान-फिकरी मुहम्मद यापैकी एका जोडीशी होईल. लक्ष्य सेन व आयुष शेट्टी यांना मात्र एकेरीत पराभव स्वीकारावा लागला. लक्ष्यने येथे पहिल्या लढतीत पराभूत होण्याची परंपरा मोडून काढत दुसरी फेरी गाठली होती. पण या फेरीत त्याला हाँगकाँगाच्या ली चेउक यियू याच्याकडून 20-22, 15-21 असा पराभव स्वीकाराला लागला. आयुष शेट्टीला अग्रमानांकित चीनच्या शि यु की याने 18-21, 21-18, 12-12 असे हरविले.