सिंधू, सात्विक-चिराग पुढील फेरीत, लक्ष्य सेन, प्रणॉय बाहेर
वृत्तसंस्था/ जकार्ता
इंडोनेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत मंगळवारी दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीतील जोडीने प्री-क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला. परंतु लक्ष्य सेनला मात्र पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.
महिला एकेरीत सिंधूने दीर्घकालीन प्रतिस्पर्धी जपानच्या नोझोमी ओकुहारावर 22-20, 21-23, 21-15 असा एक तास 19 मिनिटांच्या रोमांचक लढतीत विजय मिळविला. मी अलीकडे पहिल्या फेरीत पराभूत होत आलेली आहे, त्यामुळे असा विजय माझ्यासाठी खूप उपयुक्त आणि महत्त्वाचा आहे, असे सिंधूने तिच्या सामन्यानंतर सांगितले. सिंधूचा सामना 16 खेळाडूंच्या फेरीत थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवोंगशी होईल.
सिंधू आणि ओकुहारा, या दोघी माजी विश्वविजेत्या असून त्यांना अलीकडच्या काळात संघर्ष करावा लागला आहे. जानेवारीमध्ये झालेल्या इंडिया ओपनमध्ये सिंधू उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचली होती. या हंगामातील तिची ती सर्वोत्तम कामगिरी असून दुसरीकडे, ओकुहाराला मागील सहा स्पर्धांमध्ये दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही.
दुसरीकडे, 2021 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सेनला 65 मिनिटे चाललेल्या पहिल्या फेरीतील पुऊष एकेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या शि यू क्यूकडून 11-21, 22-20, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. शीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते, परंतु मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत तो एका स्थानाने खाली घसरला आहे.
23 वर्षीय सेनला गेल्या आठवड्यात मलेशियामध्ये झालेल्या स्पर्धेत दुखापतीमुळे सहभागी होता आले नव्हते. पण पाठीच्या दुखापतीतून परतलेल्या या खेळाडूने उल्लेखनीय लवचिकता दाखवली. दुसऱ्या गेममध्ये 11-17 असा पिछाडीवर असताना त्याने उत्साही पुनरागमन केले, एक मॅच पॉइंट वाचवला आणि 22-20 असा गेम जिंकून निर्णायक गेममध्ये पाऊल ठेवले. तथापि, ही गती अल्पकाळ टिकली. कारण शीने नियंत्रण मिळवून सामना खिशात घातला. एच. एस. प्रणॉय देखील 14 लाख 50 हजार अमेरिकन डॉलर्सच्या इनामांच्या या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 2023 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील या कांस्यपदक विजेत्याला इंडोनेशियाच्या अल्वी फरहानकडून 17-21, 18-21 असा पराभव पत्करावा लागला.
सात्विक आणि चिराग यांनी 67 मिनिटे चाललेल्या त्यांच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात लिओ रॉली कार्नांडो आणि बागास मौलाना या इंडोनेशियन जोडीला 18-21, 21-18, 21-14 असे नमवून 16 खेळाडूंच्या फेरीत प्रवेश केला. सिंधू ही पुढील फेरीत पोहोचणारी एकमेव भारतीय महिला आहे. मालविका बनसोडने इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वर्दानीविऊद्धच्या महिला एकेरीच्या सामन्याच्या मध्यास निवृत्ती घेतली. ती आधी 21-16, 16-15 अशी आघाडीवर होती. पण ती कोर्टवर घसरून पडली आणि गुडघ्यात वेदना सहन कराव्या लागून तिने निवृत्त होणे पसंत केले.