For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला ‘नॅशनल अवॉर्ड 2026’; सामाजिक कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

01:59 PM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला ‘नॅशनल अवॉर्ड 2026’  सामाजिक कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
Advertisement
ओटवणे : रक्तदान, अवयवदान आणि देहदान या सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला ‘नॅशनल अवॉर्ड 2026’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे आयोजित विशेष सोहळ्यात बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष विक्रम यादव आणि स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सन्मानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक कार्याचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी मावळ-पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय ग्राहक पंचायत अधिवेशनात प्रतिष्ठानला ‘ग्राहक पंचप्राण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर आता राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने प्रतिष्ठानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Advertisement

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ही जिल्ह्यातील अग्रगण्य सामाजिक संस्था असून रक्तदान, अवयवदान आणि देहदानाबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत 500 हून अधिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील बांबोळी रुग्णालयाच्या रक्तपेढीला एक हजारांहून अधिक रक्तपिशव्या उपलब्ध करून देण्यात संस्थेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

अवयवदान आणि देहदान जनजागृतीच्या माध्यमातून गोव्यातील धारगळ येथील आयुष हॉस्पिटलमध्ये देहदान उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही प्रतिष्ठानने केले आहे. थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त असलेल्या 17 हून अधिक बालकांना सातत्याने रक्तपुरवठा करून त्यांच्या उपचारांसाठी मदतीचा हात दिला आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुपच्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी प्रतिष्ठान विशेष प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील 20 हून अधिक व्यक्तींची या दुर्मिळ रक्तगटासाठी नोंद करण्यात आली असून, त्यापैकी तीन नियमित रक्तदाते गरजेच्या वेळी रक्तदानासाठी उपलब्ध असतात.

महाराष्ट्रासह गोवा आणि आंध्र प्रदेशातील गरजू रुग्णांनाही प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तपुरवठा केला जातो. रक्तदानाच्या माध्यमातून अनेक रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य प्रतिष्ठानकडून सुरू आहे.

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ रक्तदाते उद्धव गोरे (वय 67, ७५ वेळा रक्तदान), गोवा समन्वयक तथा विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, दोडामार्ग तालुका कार्यकारिणी अध्यक्ष भूषण सावंत, कणकवली कार्यकारिणी सहसचिव यशवंत उर्फ विनू महाडिक आणि अमोल भोगले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.