For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधूची विजयी सलामी, श्रीकांत, सेन पराभूत

06:50 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिंधूची विजयी सलामी  श्रीकांत  सेन पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था, जकार्ता

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या इंडोनेशिया खुल्या 1000 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूने विजयी सलामी देताना थायलंडच्या बुसाननचा पराभव केला. मात्र पुरूष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. पुरूष दुहेरीत भारताच्या हरिहरन अम्सकरुनन आणि एम. आर. अर्जुन यांनी दुसरी फेरी गाठली.

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात आतापर्यंत दोनवेळा ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या पीव्ही सिंधूने थायलंडच्या ओ. बुसाननचा 25-23, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना 51 मिनिटे चालला होता. या सामन्यात पहिला गेम अटीतटीचा झाला. मात्र माजी विश्वविजेत्या पीव्ही सिंधूने आपल्या आक्रमक फटक्यांच्या जोरावर हा पहिला गेम 25-23 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये बुसाननकडून फारसा प्रतिकार  न झाल्याने सिंधूने सरळ गेम्समध्ये विजय नोंदविला. या स्पर्धेत सिंधूला विद्यमान ऑलिम्पिक विजेती आणि टॉपसिडेड चीनच्या अॅन यंगशी लढत द्यावी लागेल, असा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात सिंगापूरमध्ये झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत अॅन यंगने सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला होता.

Advertisement

पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात जपानच्या युशी तनाकाने किदांबी श्रीकांतचा 21-19, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका सामन्यात इंडोनेशियाच्या अल्वी फरहानने लक्ष्य सेनचे आव्हान 21-19, 21-16 अशा गेम्समध्ये सुपंष्टात आणत विजयी सलामी दिली. महिलांच्या एकेरीतील अन्य एका सामन्यात भारताच्या मालविका बनसोडचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. थायलंडच्या सातव्या मानांकीत चोचुवाँगने बनसोडचा 21-12, 21-10 अशा गेम्समध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.

पुरूष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या हरिहरन अम्सकरुनन आणि एम. आर. अर्जुन यांनी मलेशियाच्या आयुब आणि किआँग यांचा 21-18, 21-10 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. मात्र महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांना पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. इंडोनेशियाच्या कुसुमा आणि मेलीसा ट्रायस यांनी जॉली आणि गोपिचंद यांचा 21-14, 21-12 असा पराभव केला. मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात चीनच्या वा आणि हुई यांनी भारताच्या तनिषा क्रेस्टो व ध्रुव कपिला यांचा 21-11, 21-10 असा पराभव केला.

सिंधू मानांकनात पहिल्या 10 खेळाडूंत

भारताच्या पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या मानांकन यादीत तब्बल 954 दिवसानंतर पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. इंडोनेशियात सुरू असलेल्या स्पर्धेत सिंधूने एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविल्यानंतर मानांकनात तिने पहिल्या 10 खेळाडूंमध्ये पुन्हा स्थान मिळविले आहे.

Advertisement
Tags :

.