सिंधू, लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत
लखनौ : 2024 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे सुरू झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूने तसेच लक्ष्य सेनने शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. गुरुवारी महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीच्या लढतीत या स्पर्धेतील अग्रमानांकित आणि दोनवेळा ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या पी. व्ही. सिंधूने इरा शर्माचा 49 मिनिटांच्या कालावधीत 21-10, 12-21, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. 29 वर्षीय पी. व्ही. सिंधू चालु वर्षाच्या बॅडमिंटन हंगामात सूर मिळविण्यासाठी अद्याप झगडत आहे. सिंधूने यापूर्वी म्हणजे 2022 साली सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. आता सिंधूचा पुढील फेरीतील सामना चीनच्या देई वांगशी होणार आहे. वांगने भारताच्या देवीका सिहागचा दुसऱ्या फेरीतील लढतीत 19-21, 21-18, 21-11 असा पराभव केला. पुरुषांच्या विभागात भारताच्या लक्ष्य सेनने दुसऱ्या फेरीतील सामन्यात इस्त्रायलच्या डॅनिल डुबोव्हेंकोचा 35 मिनिटांच्या कालावधीत 21-14, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.