सिंधू, लक्ष्य उपांत्य फेरीत दाखल
वृत्तसंस्था / लखनौ
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही.सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
शुक्रवारी या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताचा टॉपसिडेड तसेच दोनवेळा म्हणजे 2017 आणि 2022 साली या स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱ्या पी.व्ही.सिंधूने चीनच्या डेई वांगचा 48 मिनिटांच्या कालावधीत 21-15, 21-17 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. सध्या जागतिक महिला बॅडमिंटनपटूंच्या ताज्या मानांकन यादीत सिंधू 18 व्या तर चीनची वेंग 118 व्या स्थानावर आहे. आता पी. व्ही. सिंधूचा उपांत्य फेरीचा सामना भारताच्या उनाती हुडाबरोबर होणार आहे. अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उनाती हुडाने अमेरिकेच्या इशीका जैस्वालचा 21-16, 21-9 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. हुडाने 2022 साली ओदीशा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकाविले.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने आपल्याच देशाच्या मेरीबा लुवांग मेसनामचा 21-8, 21-19 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. लक्ष्य सेनने 2021 साली झालेल्या विश्व मॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत कास्यपदक मिळविले होते.
महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या द्वितीय मानांकित त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी चीनच्या सहाव्या मानांकित गो की आणि तेहो झींग यांचा 21-8, 21-15 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. मिश्र दुहेरीमध्ये भारताची पाचवी मानांकित जोडी ध्रुव कपिला आणि तनिशा क्रेस्टो यांनी मलेशियाच्या कून आणि ई यांचा 21-16, 21-13 असा फडशा पाडत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. पुरुष एकेरीमध्ये भारताच्या आयुष शेट्टीला ओगेवाकडून 7-21, 14-21 अशा गेम्स्मध्ये हार पत्करावी लागली. तसेच महिला एकेरीत भारताच्या तसनिम मीर आणि एस. वलिशेट्टी यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.