सिंधू उपांत्य फेरीत, सात्विक-चिराग पराभूत
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या भारताच्या पीव्ही सिंधूने मलेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली तर पुरुष दुहेरीची जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
सिंधू व जपानची अकाने यामागुची यांच्यात उपांत्यपूर्व लढत चालू होती. सिंधूने पहिला गेम 21-11 असा जिंकला होता. गुडघ्यावर नी कॅप घालून खेळणाऱ्या यामागुचीने यानंतर सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सिंधूला उपांत्य फेरीत स्थान मिळाले. जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानावर असणाऱ्या सिंधूचे यामागुचीविरुद्धचे रेकॉर्ड आता 15-12 असे झाले आहे. दुखापतीच्या दीर्घ सुटीनंतर सिंधूने या स्पर्धेतून पुनरागमन केले आहे. तिची उपांत्य लढत चीनच्या दुसऱ्या मानांकित वांग झियी हिच्याशी होईल. वांगने सहाव्या मानांकित इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वारदानीचा 21-17, 21-18 असा पराभव केला.
सात्विक-चिराग पराभूत
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कांस्यपदक जिंकणाऱ्या सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली. त्यांच्यापेक्षा कमी मानांकन असणाऱ्या इंडोनेशियाच्या फजर अल्फियान व मुहम्मद फिक्री यांच्याकडून त्यांना 10-21, 21-23 असा पराभव स्वीकारावा लागला. 47 मिनिटे हा संघर्ष रंगला होता. भारतीय जोडीने या स्पर्धेत तिसरे मानांकन मिळाले होते. त्यांना मागील वर्षी हाँगकाँग ओपन व चायना मास्टर्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
पहिल्या गेममध्ये इंडोनेशियन जोडीने त्यांच्यावर सहज मात केली. पॉवरफुल स्मॅशेसच्या आधारे त्यांनी हा गेम एकतर्फी जिंकला. दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने जोरदार संघर्ष करीत काही वेळा आघाडीही घेतली. 18-14 वर असताना सात्विक-चिराग यांना ही टिकवता आली नाही आणि प्रतिस्पर्ध्यांना पकड मिळविण्याची संधी दिली. त्यांनी 19-19 वर भारतीय जोडीला गाठले आण्णि 21-21 अशा बरोबरीनंतर इंडोनेशियन जोडीशने शेवटचे दोन गुण घेत गेमसह सामना जिंकत आगेकूच केली.