दुबईत सिंधूने प्रशिक्षकासह अनुभवले तणावपूर्ण क्षण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूला रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तणावपूर्ण आणि भयावह प्रसंगाचा सामना करावा लागला. आखाती प्रदेशातील वाढत्या तणावादरम्यान ती आणि तिचे इंडोनेशियन प्रशिक्षक असलेल्या भागाजवळ स्फोट झाल्यानंतर विमानतळावर अडकले होते.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केल्यानंतर हा गोंधळ उडाला, ज्यामुळे संयुक्त अरब अमिरातीसह आखाताच्या काही भागांमध्ये प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र हल्ले झाले. या घडामोडींमुळे अनेक विमान कंपन्यांना उ•ाणे रद्द करावी लागली किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले. 3 मार्चपासून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणारी सिंधू या प्रदेशात क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर शनिवारपासून दुबईमध्ये अडकली आहे.
आमचे विमान दुबईमध्ये उतरल्यानंतर, आमच्या नियंत्रणाबाहेरील घटना घडू लागल्या. काही वेळातच हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आणि शेवटचे काही तास अत्यंत तणावपूर्ण होते. आम्हाला क्षेपणास्त्रs अडवण्याचे आवाज ऐकू येत होते,, असे सिंधूने सांगितले. ‘काही तासांनंतर दुबई विमानतळावर आम्ही जिथे अडकलो होतो त्याच्या अगदी जवळ एक स्फोट झाला. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा माझे प्रशिक्षक जवळजवळ 100 मीटर अंतरावर होते आणि त्यांना त्या परिसरातून लवकर बाहेर पडावे लागले. इतक्या जवळच्या परिसरात असे काही तरी अनुभवणे खरोखरच तुमचा पायाच हादरवून टाकते, असे ती पुढे म्हणाली.
तिचे प्रशिक्षक इरवन्स्याह आदी प्रतामा यांनीही या घटनेची पुष्टी केली आणि थोडक्यात बचावल्याचे सांगितले. विमानतळावर स्फोट झाला म्हणून आम्ही सध्या येथे अडकलो आहोत. त्यांनी आम्हाला हॉटेलमध्ये ठेवले आहे, आम्ही ठीक आहोत पण त्याच वेळी पुन्हा थोडी चिंता आहे. आम्हाला ऑल इंग्लंडला जायचे आहे. मला आशा आहे की, आम्ही लवकर बाहेर पडू शकू कारण सिंधूचा सामना बुधवारी आहे, असे त्यांनी सांगितले. सिंधूने सांगितले की, तिला आणि तिच्या सपोर्ट स्टाफला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ‘आम्ही सर्व जण आता सुरक्षित आहोत आणि दुबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या आणि दुबईतील अधिकारिणींच्या अथक प्रयत्नांमुळे आम्हाला अधिक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, असे तिने सांगितले. दुबईतील भारतीय उच्चायुक्तालयाचे प्राधान्याने प्रतिसाद दिल्याबद्दल आणि अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांना तैनात केल्याबद्दल तिने आभार मानले.